शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना अस्मान दाखवा – आमदार भास्कर जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गद्दार गेले; मात्र सामान्य जनता शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना अस्मान दाखवा, त्यासाठी सर्वांनी एकजूट करावी, असे सांगत देश वाचवायचा असेल तर भाजप सरकारला हद्दपार करावेच लागेल, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा भंडाफोड करण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’ अभियान राबविण्यात येत आहे. राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार जाधव बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संपर्कप्रमुख करवीर विधानसभा सुरेश चौगले, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महिला उपशहरप्रमुख प्रा. विद्या हुडे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भाजपवर हल्लाबोल करताना आमदार जाधव म्हणाले, भाजप संविधान संपवत आहे. लोकशाही संपत चाललीय, हुकूमशाहीने भाजप विचारस्वातंत्र्यावर घाला घालत आहे. सर्वत्र महागाई वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमतीने सामान्य जनता होरपळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ला ‘आम्हीच येणार’ अशी अहंकाराची भाषा करत आहेत. देश वाचवायचा असेल तर विद्यमान भाजप सरकारला हद्दपार करावेच लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

‘उघडा डोळे, बघा नीट’ असे सांगत आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक यांना आगामी निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.

शासनाच्या योजना फसव्या असल्याचे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला पोकळ प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करून ‘अच्छे दिन’ आणू असे सांगितले होते. मात्र, या देशात फक्त अदानी, अंबानी यांनाच अच्छे दिन आल्याची टीका प्रा. विद्या हुडे यांनी केली.

यावेळी सुरेश चौगले यांच्या प्रयत्नातून मनरेगा योजनेतून नरतवडे गावांतर्गत आरसीसी रस्त्यासाठी 20 लाख मंजूर झाले असून, या कामाचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास भिकाजीराव हळदकर, तालुकाप्रमुख उत्तम पाटील, रवींद्र पाटील, सागर पाटील, आर. डी. व्हरांबळे, एम. एन. पाटील आदी उपस्थित होते.