सौदी अरेबियातील इंधनसाठा असलेल्या ठिकाणावर दहशतवादी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियातील जेद्दा या शहरात असलेल्या तेल इंधनाच्या साठ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याने भीषण आग लागली आहे. या हल्ल्याची जबाबदारी येमेनमधील दहशतवादी संघटना हुतीने घेतली आहे.

जेद्दा या शहरात लवकरच प्रसिद्ध अशी फॉर्म्युला वन कार रेसिंग स्पर्धा भरवली जाणार आहे. तत्पूर्वी हा हल्ला करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी माध्यमांनी तेल साठ्यावरील हल्ला हा शत्रुंची कुरापत असल्याचं म्हटलं आहे. तर अल मसीरा या आपल्या अधिकृत वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हुती दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

शुक्रवारी जेद्दा शहराच्या विमानतळानजीक असलेल्या नॉर्थ जेद्दा बल्क प्लांटवर हल्ला झाला. त्यानंतर या प्रकल्पाला आग लागली. संपूर्ण शहरात 5 वाजून 40 शहरात धूर दिसायला लागला. त्यानंतर काही वेळाने हुती दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची जबाबदारी घेतली.

या पूर्वी दोन वेळा हुती दहशतवाद्यांनी जेद्दाच्या उत्तर भागातील प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. गेल्या रविवारीही याच भागात हल्ला करण्यात आला होता. उत्तर जेद्दा प्रकल्पात डीझेल, गॅसोलीन आणि जेट इंधनाचा साठा केला जातो.