
सामना प्रतिनिधी । पुणे
पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित `भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका व हिराबाईंच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी प्रसिद्धिपत्रकातून केला आहे.
`भाई’ हा चित्रपट हिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला बदनाम करणारा व त्यांचा अपमान करणारा आहे. हिराबाई बडोदेकर यांचे प्रभा अत्रे यांच्याशी 1947 पासून कौटुंबिक संबंध आहेत. हिराबाई या अत्यंत शालीन, सौम्य, मृदू पण भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या होत्या. तसेच पुल, भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे यांच्यापेक्षा 15 ते 20 वर्षांनी मोठ्या होत्या. या सर्वांना त्या गुरुस्थानी होत्या. तरीही चित्रपटात हे सगळे हिराबाईंचा एकेरी नावाने उल्लेख करताना दाखविले आहे. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री ही त्यांच्या सम वयाची दाखविली आहे. तसेच तिचे हावभावही फार भडक दाखविण्यात आले आहेत, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
हिराबाईंचे घर हे सर्व कलाकारांसाठी स्वरमंदिर होते. पण, सगळ्यात कळस म्हणजे या चित्रपटात त्यांचे घर म्हणजे दारू मिळणारी जागा दाखविले आहे. यामुळे हिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन झाले आहे, असा आरोप अत्रे यांनी केला आहे.































































