
इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ते जून 2026 पर्यंत आयबीचे संचालक म्हणून कार्यरत राहतील. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
काय आहे मुदतवाढीचे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ जून 2025 मध्ये संपणार होता. मात्र त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असं सांगण्यात येत आहे. डेका यांनी दहशतवादविरोधी कारवाया आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रभावी काम केले आहे, असेही बोलले जात आहे. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरो ही हिंदुस्थानची अंतर्गत गुप्तचर संस्था असून, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते.




























































