
ICC T20 World Cup 2026 मध्ये आज नेदरलॅंड्स आणि नामिबिया यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 156 धावा करत नेदरलॅंड्सला 157 धावांचे माफक आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग नेदरलॅंड्सने 12 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केलं आणि 7 विकेटने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह गुणतालिकेत नेदरलॅंड्सने पाकिस्ताना पिछाडीवर टाकलं आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल नेदरलॅंड्सने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे नेदरलॅंड्सच्या एकाही गोलंदाजाने चार षटके पूर्ण केली नाही आणि एकूण 8 खेळाडूंनी गोलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. नामेबियाला 20 षटकांमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 156 धावा करता आल्या. नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक (30) आणि निकोल लॉफ्टी-ईटन (42) यांनी सर्वाधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलॅंड्सच्या बास दे लीडे याने 48 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची विस्फोटक खेळी केली.
नेदरलॅंड्स संघाचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. ग्रुप ए मध्ये हिंदुस्थान, अमेरिका, नेदरलॅंड्स, नामिबिया आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ताज्या आकडेवारीनुसार हिंदुस्थान 2 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आता नेदरलॅंड्स उडी मारली आहे. नेदरलॅंड्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेट रनरेटच्या आधारे नेदरलॅंड्सने पाकिस्तानला पिछाडीवर टाकलं आहे.


























































