… म्हणून अनुष्का हिंदुस्थान-पाकिस्तानमधील ‘हाय व्होल्टेज’ लढतीला मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यानंतर सर्व जगभराला प्रतिक्षा असणारा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना 16 जून रोजी मॅनचेस्टरमध्ये रंगणार आहे. परंतु हा ‘हाय व्होल्टेज’ सामना पाहण्यासाठी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा उपस्थित राहू शकणार नाही.

क्रिकेटपटूंना विश्वचषक स्पर्धेसाठी जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली होती. परंतु एक अटही ठेवली होती. हिंदुस्थानच्या पहिल्या सामन्यापासून 21 दिवसानंतर खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसी विश्वचषक सामन्यांसाठी हजर राहू शकणार आहेत, तसेच फक्त 15 दिवस खेळाडू पत्नी व प्रेयसींना सोबत ठेऊ शकणार आहेत. या अटीमुळेच अनुष्का आणि अन्य खेळाडूंच्या पत्नी व प्रेयसी या हाय व्होल्टेज लढतीला मुकणार आहेत.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हा मुद्दा प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्यापुढे उपस्थित केला होता. याबाबत चर्चा केल्यानंतर वर्ल्ड कपदरम्यान पत्नी-प्रेयसीला सोबत नेण्यास परवानगी दिली होती. मात्र विश्वचषकादरम्यान पहिले 21 दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला सोबत नेता येणार नाही, अशीही अट बीसीसीआयने खेळाडूंपुढे ठेवली होती.

हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जून रोजी आहे. यानंतर 21 दिवस म्हणजे जवळपास 26 जूनच्या आसपास खेळाडूंच्या पत्नी व प्रेयसी यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळेल. 26 जूनच्या आसपास हिंदुस्थानचा संघ शेवटचे साखळी सामने खेळत असणार आणि विश्वचषकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळाडूंसोबत थांबण्याची इच्छा असल्यास खेळाडूंच्या पत्नी व प्रेयसींना त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.