
आयसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या रविवार, 17 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाचे सचिव गेरी अराथून यांनी ही माहिती दिली. सायंकाळी 5 वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सीआयएससीईचे करीअर पोर्टल, आयसीएसई बोर्डाची वेबसाईट तसेच एसएमएसमार्फत हा निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंतिम निकालामध्ये सेमिस्टर-1 आणि सेमिस्टर-2 या दोन्ही सेमिस्टरना समान महत्त्व देण्यात आले आहे. सेमिस्टर-1, सेमिस्टर-2 आणि प्रोजेक्ट यांना मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणांमध्ये समावेश असणार आहे. या दोनपैकी एकाही सेमिस्टरची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली नसेल तर त्यांना गैरहजर म्हणून गृहीत धरून त्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



























































