आयडियलची ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा

श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशपांडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमीतर्फे 27 व 28 सप्टेंबर रोजी अखिल हिंदुस्थानी स्तरावर खुली मोफत प्रवेशाची ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने होणाऱ्य़ा स्पर्धेत विजेत्या-उपविजेत्यांना एकूण 10 रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.

बापूसाहेब देशपांडे स्मृती ऑनलाइन खुली विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर होईल. 11 साखळी फेऱ्य़ांमधील प्रत्येक स्पर्धकाचा सामना 3 मिनिटे वेळेचा राहील. अरेना इंटरनॅशनल मास्टर राजाबाबू गजेंगी, इंटरनॅशनल आर्बिटर प्रेम पंडित आदी प्रमुख पंचांच्या मंडळास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, बुद्धिबळपटू ओमकार चव्हाण व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांचे सहकार्य लाभणार आहे.

नामवंत सिव्हिल इंजिनीअर व सधन परिस्थिती असतानादेखील बापूसाहेब देशपांडे यांनी चार दशकांपूर्वी निःस्वार्थ समाजसेवेला वाहून घेतले. आयडियलतर्फे त्यांच्या सहकार्याने झालेली पहिली मुंबई इंटरनॅशनल फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा बुद्धिबळपटूंना भावली. राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक-संगीत, खादी उद्योग, व्यसनमुक्ती, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील अनेक संस्थांच्या कार्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या