आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस देखील शिवसेनेला मतदान करतील, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या निवडणुकीत विजय झाला किंवा पराभव झाला म्हणून अणुबाँम्ब कोसळला किंवा महाप्रलय आला असे होत नाही. अनेक राज्यात असे निकाल लागले आहेत. राजस्थानात काँग्रेस जिंकली आहे. तर हरियाणात रडीचा डाव करून भाजप जिंकली आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपचे नेते काय करत होते याची सगळी माहिती आम्हाला आहे. गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते. कोणाचे मत बाद करावे याबद्दल काय चर्चा होत होती. याबद्दल आम्हाला सर्व माहिती आहे. यंत्रणा आमच्याकडे देखील आहेत फक्त ईडी नाही. 2 दिवसांसाठी ईडी आमच्या कडे दिली तर देवेंद्र फडणवीस देखील शिवसेनेला मतदान करतील. असा निशाणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर साधला आहे. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले की फुटलेल्या आमदारांबाबत आम्ही फक्त आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अपमान करण्याचा हेतू नाही. आम्ही काय बोलत आहोत हे त्यांना ही माहिती आहे आणि भाजप ला देखील माहित आहे. आमच्या हातात 2 दिवसांसाठी ईडी दिली तर भाजप देखील शिवसेनेला मतदान करेल.

ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधकांना एकत्र बोलावून बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तेथील प्रमुख नेते सहभागी असणार आहेत. त्यासाठीचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलं आहे. 15 तारखेला ही बैठक असणार आहे. मात्र त्यावेळी आम्ही अयोध्या दौऱ्यावर असणार आहोत. परंतु दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला शिवसेनेतर्फे काही मोठ्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही या बैठकीला हजार असणार आहोत. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. केंद्रीय यंत्रणांचा होत असलेला गैरवापर, बिगर भाजपशासित राज्यांना दिली जाणारी वागणूक, हे सर्व मुद्दे या बैठकीत असणार आहेत. अशी माहिती राऊत यांनी दिली.

यावेळी पंकजा मुंडेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणले की पंकजा मुंडे यांच्याबद्दल आम्हाला चिंता आहे कारण त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जर त्यांच्या कुटुंबासोबत काही वेगळे घडत असेल तर आम्हाला चिंता वाटणारच. राजकारण राजकारणाच्या जागी मात्र ठाकरे परिवार व शिवसेनेशी मुंडे कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपाची युती टिकून राहावी यासाठी गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व महत्वाची भूमिका बजावत होतं.

जर देशभरातील हिंसाचाराच्या घटना पाकिस्तान पुरस्कृत असतील तर तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाका. सत्ता तुमच्याकडे आहे. तिथे लडाख मध्ये चीन त्यांचे टॅंक आणि शस्त्र घेऊन घुसले आहे. त्या चीनकडे डोळे वर करून बघा. पाकिस्तानचं आम्ही बघून घेऊ. अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली आहे.

चंद्रकांत पाटलांच्या मी सामना वृत्तपत्र वाचत नाही या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की सर्वात आधी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे सामना वाचतात. पूर्वी ते चोरून वाचायचे आता उघडपणे वाचतात. कारण त्यांना सामना वाचावाच लागतो.