
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून पैसे गुगल पेद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगणाऱ्या दोन चोरटय़ांना पवई पोलिसांनी अटक केली. आयुष राजभर आणि सतीश यादव अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी एक चाकू आणि काही रक्कम हस्तगत केली आहे.
पवईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये राहणारा ऋषिकेश बोडस हा गेल्या महिन्यात रेनिसन्स हॉटेल येथून जात होता तेव्हा त्याला दोन तरुणाने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. मारहाण करून गुगल पेद्वारे 18 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्या तरुणाने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही घटना ताजी असतानाच तशाच प्रकारे आणखी एका आयआयटीच्या विद्यार्थ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 5 हजार 700 रुपये ट्रान्सफर करून घेतले. या दोन्ही घटनांची गंभीर दखल पवई पोलिसांनी घेतली.
परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हारगुडे, विनोद पाटील, टिळेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. पैसे कोणत्या खात्यात जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तपास करून आयुष आणि सतीशला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीच्या गुन्ह्यात त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.




























































