मनमाड बस स्टॅण्डलगतची अतिक्रमणे जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना वार्ताहार, मनमाड

मालेगाव-मनमाड-शिर्डी राज्यमार्गावर मनमाड शहरातील बस स्टॅण्डलगतची ९ अतिक्रमणे मनमाड नगरपालिकेने शनिवारी सकाळी जमीनदोस्त केली. पाकिझा कॉर्नर चौफुलीवरील या अतिक्रमणांमुळे रहदारीवर परिणाम होऊन बरेचदा वाहतूककोंडी होत होती. या कारवाईसाठी मनमाड नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासह मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे येथील ग्रामीण रुग्णालय आणि बस स्टॅण्ड परिसराने मोकळा श्वास घेतला.

पाकिझा चौफुली हा उपजिल्हा रुग्णालयाच्या लगतचा परिसर मनमाड शहराचे प्रवेशद्वार समजला जातो. मालेगाव-शिर्डी राज्यमार्ग तसेच शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला रास्ता व भारतीय अन्न महामंडळ गोदामाकडे जाणारा रस्ता यामुळे अहोरात्र या चौफुलीवरून वर्दळ सुरू असते. याच पाकिझा चौफुलीवर उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतीलगत ही अतिक्रमणे गेल्या अनेक वर्षांपासून होती व त्याबाबत तक्रारीही होत्या. अवैध धंदेही येथे चालत असल्याच्या तक्रारी होत्या.

आज पहाटे सहाच्या सुमारास नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक येथे दाखल झाले. २ जेसीबी, ३ पालिकेच्या गाडय़ा, एक ट्रक्टर, पालिकेचा आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महावितरण अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा १५० जणांच्या पथकाने पहाटे ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली व पाकिझा चौफुलीवरील नऊ अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यामुळे ग्रामीण रुग्णालय व बस स्टॅण्ड परिसराने आज मोकळा श्वास घेतला. या कारवाईमुळे पाकिझा चौफुलीवरील वाहतूक आता सुरळीत होणार आहे.

या कारवाईच्या वेळी नगरपलिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, सहाययक पोलीस निरीक्षक शिवकुमार पांढरे, पालिका अभियंता श्यामकांत जाधव, संदीप तोरणे आदी उपस्थित होते.