
सामना प्रतिनिधी । परळी
शहरात होत असलेली अवैध दारूविक्री आता दिवसेंदिवस आपले पाय पसारतांना दिसून येत आहे. शहरात असलेल्या हिंद नगर, अरुणोदय मार्केट परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, जलालपूर रोड अशा विविध मार्गावर दारूची होत असलेली अवैध विक्री आता चिंतेचे कारण होत चालली आहे. दारू पिऊन मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
शहरातल्या अनेक भागातील टपऱ्या या दारूविक्रीचे जणू केंद्रच झालेले आहेत.१ रुपयाचा प्लास्टिक ग्लास आणि जार अशा स्वरूपातच या टपऱ्यामधून सर्रास ही दारूविक्री केली जात आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. ड्राय-डे च्या दिवशी तर दारूची विक्रमी विक्री होते. यासाठी अल्पवयीन मुलांचाही वापर केला जात आहे. पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
शहरातल्या हिंद नगर परिसरात होत असलेल्या अवैध दारूविक्री बाबत नागरिकांनी अनेकदा तक्रार देऊनही त्याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. हिंद नगर भागातील रहिवासी शिवकुमार केदारी यांनी याबाबत चे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले असूनही या परिसरातील अवैध दारू विक्रेत्यावर कुठलीच कारवाई प्रशासनाने आजतागायत केलेली दिसत नसल्याचे सांगितले आहे. गेल्या महिन्यात याच परिसरात एका टपरीजवळ होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून आपल्या पाल्यांची शिकवणी बंद करण्याची वेळ पालकांवर आली होती.


































































