अवैध मुरुम उत्खनन प्रकरण – कुर्डू गावकऱ्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या वादावादीनंतर कारवाईसाठीं गेलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

माढा तालुक्यातील कुर्डू गाव अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी राज्यभर गाजत आहे. या अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी केल्याचा व्हिडीओ राज्यभर गाजत आहे. त्यातच आता कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यावर गावकरी बेसबॉल स्टीकने हल्ला करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक कुर्डू गावात आले असताना, गावातील काही गुंडांनी बेसबॉल स्टीक घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी घटानस्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरील काही पोलीस व गावकरी मदतीला धावल्याने अधिकारी व कर्मचारी बचावले.