भाजपचा फुगा फुटणार,2019 ला 200 जागा मिळणेही मुश्किल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-shah-tense

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 ची पुनरावृत्ती होईल अशी हवा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून भरली जात असली तरी या हवेतच भाजपचा फुगा फुटणार असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. 2019 ला भाजपची महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पडझड होईल. स्वबळावर सत्ता तर मिळणारच नाही उलट 200च्या आसपास जागा मिळाल्यास पंतप्रधानपदावर मोदी पुन्हा नकोत ही मागणीच जोरदारपणे पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

मे महिन्यात ‘सीएसडीएस-लोकनीती’ने देशव्यापी सर्व्हे करून जनतेचा कौल जाणून घेतला होता. मात्र, सविस्तरपणे पहिल्यांदाच या सर्व्हेतील मुद्दे समोर आले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील प्रोफेसर जेम्स म्यानोर यांनी ‘द वायर’ मध्ये लिहिलेल्या लेखात सर्व्हेतील ठळक बाबी जनतेसमोर आणल्या आहेत. हिंदुस्थानातील राजकीय, सामाजिक  घडामोडींचे सखोल अभ्यासक असलेले जेम्स म्यानोर यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचा हा लेख म्हणजे मोदी सरकारची झोप उडविणारच आहे.

सर्वच घटक सरकारवर नाराज

  • आजवर जनतेसमोर कधीही समोर न आलेल्या धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.
  • ज्या लोकांचा सर्व्हे घेण्यात आला त्यातील तब्बल 61 टक्के लोकांनी महागाई नियंत्रणासाठी सरकारने काहीही केले नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे.
  • 61 टक्के लोकांना वाटते, केंद्रातील मोदी सरकार भ्रष्ट आहे.
  • भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी सरकारने काही केले नसल्याचे 55 टक्के लोकांचे मत.
  • विकासाबाबत भाजप कितीही मोठे दावे करीत असली तरी 64 टक्के लोक याबाबत असमाधानी आहेत.
  • बेरोजगारीचा प्रश्न देशात ऐरणीवर आहे. 2014 ला मोदींनी आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही असे 57 टक्के लोकांना वाटते.
  • या सर्व्हेमध्ये 47 टक्के लोक सरकारवर समाधानी नाहीत. गेल्या वर्षी ही टक्केवारी 27 होती. त्यात तब्बल 20 टक्के लोकांची भर पडली आहे.
  • 2014 च्या निवडणुकीतील 38 टक्के मतदारांना वाटते पुन्हा भाजप नको.

उत्तरप्रदेश, बिहारमध्ये दणका बसेल

  • देशातील मोठय़ा राज्यांमध्येच भाजपची जबरदस्त पिछेहाट होईल असा अंदाज आहे.
  • बिहारमध्ये 40 जागापैकी 22 जागा भाजपला मिळाल्या होत्या. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयुबरोबर आघाडी केली तरी भाजपच्या जागा 2019 ला कमी होतील.
  • सर्वात दारूण पराभव उत्तरप्रदेशात होण्याची शक्यता आहे. 2014 ला 80 पैकी 71 जागा भाजपला मिळाल्या होत्या. पण 2019 ला सपा, बसपा एकत्र आल्यास भाजपला झटका अटळ आहे.
  • मध्यप्रदेश आणि राजस्थानातही भाजपपासून मतदार दुरावला आहे. या दोन राज्यात 54 जागा आहेत. 2014 ला भाजपला 52 जागा मिळाल्या होत्या. 2019 ला यातील बहुतांशी जागी भाजपचा पराभव होईल असा अंदाज आहे.
  • दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू, पुडूचेरी, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये 102 लोकसभेच्या जागा आहेत. 2014 ला भाजपला 4 जागा होत्या. त्यात 2019 मध्ये फार सुधारणा होणार नाही.

अनेक राज्यांमध्ये पडझड

  • 2014 च्या निवडणुकीत भाजपला तब्बल 282 जागा मिळाल्या होत्या. पण 2019 ला ही पुनरावृत्ती अशक्य आहे.
  • राज्यनिहाय विचार केल्यास 2019 ला भाजपला केवळ ओडिशामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये
    21 पैकी एक जागा भाजपला मिळाली होती. 2019 ला 10 ते 15 जागा वाढू शकतात.
  • थोडा फायदा आसाममध्ये होईल. 2014 ला येथे 14 पैकी 7 जागा भाजपला मिळाल्या होत्या.
  • पश्चिम बंगालमध्ये 2014 ला 42 पैकी 2 जागी भाजप विजयी झाले होते. 2019 ला भाजपची स्थिती किंचित सुधारू शकते.
  • या उत्तरपूर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या केवळ 87 जागा आहेत. त्यामुळे भाजपला फार फायदा नाही.
  • महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2014 ला 23 जागी भाजप होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जोरदार दणका बसेल.
  • दिल्ली, हरियाणा, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यांतून 63 खासदार निवडून येतात. 2014 ला यापैकी 59 खासदार भाजपचे होते. पण 2019 ला हे चित्र नसेल. येथील भाजपच्या जागा कमी होतील.