
वरळी येथील शासकीय दूध योजनेच्या जमिनीवरील काही भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय होणार आहे. यामध्ये वरळी दुग्धशाळेच्या जमिनीपैकी काही ठरावीक भाग ‘मरीन रिसर्च इन्स्टिटय़ूट अॅक्वारियम आणि एक्झिबिशन सेंटरकरिता आरक्षित करून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच घेतला आहे. यानुसार पर्यटन संकुल व मत्स्यालयासाठी जागा आरक्षित करण्यासाठी सुधार समितीमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना वरळी डेअरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारण्याची घोषणा केली होती. यानुसार काही जागेत पर्यटन संकुल होणार असून उर्वरित क्षेत्रावर विद्यमान शासकीय कार्यालय राहणार आहे. याबाबत जागेचे फेरफार आरक्षण दाखवण्यासाठी हरकती-सूचनाही घेतल्या गेल्या आहेत. नगररचना उपसंचालक बृहन्मुंबई यांची हरकती-सूचना घेण्यासाठी नेमणूकही करण्यात आली होती. दरम्यान, जागेच्या फेरफारीसंदर्भात आणि फेरफारीच्या अनुषंगाने राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याचे अधिकार देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुधार समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
मुंबईत आणखी एक पर्यटन केंद्र वाढणार
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन केंद्रामुळे मुंबईत आणखी एक पर्यटन केंद्र वाढणार आहे. शिवाय मुंबईच्या सौंदर्यातही यामुळे भर पडणार आहे. त्यामुळे सुधार समितीमध्ये जागेच्या फेरीफारीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळणार असल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.



























































