इम्रान खान यांचं तिसरं लग्नंही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर, बायको राहतेय मैत्रिणीच्या घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय आयुष्यसोबत त्यांचं वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त ठरताना दिसत आहे. इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा ही घर सोडून लाहौर येथे मैत्रिणीच्या घरी राहायला गेली आहे. त्यांचा विवाह घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

इम्रान खान यांनी आपली दुसरी पत्नी रेहम खान हिच्याशी घटस्फोट घेऊन 2018मध्ये बुशरा यांच्याशी विवाह केला होता. काही काळापासून इम्रान हे सुफी संप्रदायाकडे झुकू लागल्याने ते बुशरा यांच्या माहेरी थांबत असत. याच दरम्यान त्यांचा बुशरा यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. बुशरा या स्वतःला आध्यात्मिक हीलर असं संबोधतात. बुशरा यांनी इम्रान यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांच्या पीटीआय या पक्षावर नियंत्रण मिळवल्याचंही बोललं जातं.

इम्रान हे देखील पक्षातील अंतर्गत विरोध किंवा महिलांची नाराजी अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बुशरा यांना पुढे करतात, अशीही चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये आहे. काही काळापूर्वी बुशरा यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप झाला होता. बुशरा यांचा स्वभाव अत्यंत तापट असून त्यांनी फकत दरवाजा उघडायला उशीर झाला या कारणास्तव 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. लग्न झाल्यानंतर बुशरा यांचा चेहरा त्यांच्याच घरातील अनेक नोकरांनी पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्याभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं होतं. इम्रान यांनी अनेकदा आपल्या पत्नीचं जाहीररित्या कौतुक केलं होतं.

आता इम्रान आणि बुशरा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. बुशरा यांनी बनी गाला हे खान यांचं घर सोडलं असून त्या लाहौर येथील आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेल्या आहेत.