
अर्थमंत्री निर्मलासीतारामन यांनी बुधवारी सादर केलेल्या केंद्रीय सअर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 2023-24 या वर्षासाठी भरीव तरतूद केली आहे. या वर्षी होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2024 मध्ये होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सरकारने क्रीडा विभागासाठी 3,397.32 कोटी रुपयांची तरतूद केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जवळपास 723.97 कोटी रुपयांची यात वाढ झाली आहे.
गतवर्षी मिळाली तरतुदीपेक्षा कमी रक्कम
2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 3062 कोटी रुपयांची तरतूद केली होती, मात्र क्रीडा मंत्रालयाला केवळ 2673.35 कोटी रुपयेच मिळाले होते. यावेळी तरी सरकार केलेल्या घोषणेला जागते की नाही ते बघावे लागेल. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी यंदा 1,045 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी ती 606 कोटी रुपये होती. ऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल यांसारख्या प्रमुख जागतिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यकता लक्षात घेऊन यंदा गतवर्षीपेक्षा 439 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.
राष्ट्रीय डोप चाचणीसाठी आता थेट तरतूद
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणसाठी (साई) 36.09 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ‘साई’ला 749.43 कोटी रुपये मिळाले होते. यंदा हा आकडा 785.52 कोटी रुपये इतका आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात 280 कोटी रुपये मिळाले होते. यंदा 325 कोटी रुपये मिळणार आहेत. याचबरोबर नॅशनल अॅण्टी-डोपिंग एजन्सी (नाडा), वर्ल्ड अॅण्टी-डोपिंग एजन्सी (वाडा) आणि राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा यांना आधी ‘साई’कडून निधी मिळत होता. आता त्यांना थेट निधी मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ‘नाडा’ला 21.73 कोटी रुपयांचा निधी, तर राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेसाठी 19.50 कोटी रुपये थेट मिळणार आहेत.




























































