कोंढव्यात टोळक्याची कुत्र्यांवर तुफान दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी जेष्ठ महिलेला चावा घेतल्याच्या रागातून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने कुत्र्यांवर तुफान दगडफेक करून जखमी केल्याची घटना 29 मेला घडली आहे. याप्रकरणी रेनू बॅनर्जी (64, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेनू कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये राहायला आहेत. त्यांच्या घरामागे काही भटके कुत्रे आहेत. तीन दिवसांपुर्वी कुत्र्यांनी एका जेष्ठ महिलेला चावा घेतला होता. त्याचा राग आल्यामुळे 10 ते 15 जणांच्या टोळक्याने रेनू यांच्या घरावर दगडफेक केली. तुम्ही भटक्या कुत्र्यांना का पाळले आहे, एका आजीला कुत्रे चावले आहे, असे सांगत टोळक्याने परिसरातील कुत्र्यांवर तुफान दगडफेक करून त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी प्राण्यांचा छळ अधिनियमानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.