डोंगराला लागणाऱया वणव्यांवर उपग्रहाचे लक्ष

डोंगरांना लागणारे वणवे संबंधित यंत्रणेला समजायला जितका जास्त वेळ लागतो, तितके वनसंपदेचे नुकसान अधिक होत असते. मात्र, आता यावर उपग्रहाद्वारे नजर ठेवली जाणार आहे. वणवा लागला की लगेच तो संदेश क्षणात संबंधित यंत्रणेला पोहोचेल आणि ती यंत्रणा विद्युत वेगाने त्या ठिकाणी पोहोचून वणवा कमीत कमी वेळेत आटोक्यात आणेल. वनसंपदा आणि प्राणिमात्रांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही प्रणाली देवदूतच ठरणार आहे.

उन्हाळ्याला सुरुवात झाली की जंगलात वणव्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडतात. जंगलात आग लागल्यास ती परंपरागत पद्धतीने आटोक्यात आणली जाते. मात्र, उन्हाळ्यात जंगलात लागणारी आग त्वरेने पसरते. त्यामुळे काही तासांतच जंगल आगीने वेढले जाते; परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील जंगलात लागणाऱया आगीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी नवा सॅटेलाईट विकसित केला आहे. हा सॅटेलाईट डेहराडून येथून नियंत्रित केला जात असून, जंगलात आग लागल्यास त्याची माहिती क्षणात संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱयांच्या मोबाईलवर येते. ही आग नेमकी कोणत्या वनखंडात लागली आहे, गाव, परिसराचा नकाशा, क्षेत्रपरिसर आदी माहिती मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना मिळते.

सॅटेलाइटद्वारे जंगलातील आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱयांना मिळावी, यासाठी त्यांची कनेक्टिव्हिटी मोबाईलने जोडण्यात आली आहे. यापूर्वी जंगलात आग लागल्यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱयांना त्या आगीची माहिती उशिराने मिळायची. आगीबाबत अधिकाऱयांना वन कर्मचाऱयांवर अवलंबून राहावे लागत होते; परंतु आता जंगलात आग लागल्यास ही माहिती सर्वात प्रथम वरिष्ठ अधिकाऱयांना समजते. त्यानंतर या आगीची माहिती वनपाल, वनरक्षकांपर्यंत पोहोचते.

ड्रोन अन् फायर ब्लोअरचा वापर

सॅटेलाइटच्या संदेशानुसार वणवा नेमक्या कोणत्या ठिकाणी लागला, याची माहिती मिळाल्यानंतर हा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी वणवा आटोक्यात आणण्यासाठी वाळू व पाण्याचा वापर केला जात होता. मात्र, मोठय़ा प्रमाणात एखाद्या दुर्गम ठिकाणी वणवा लागल्यास तेथे हे साहित्य घेऊन तो वणवा आटोक्यात आणणे अवघड होते. त्यामुळे वन विभागाने नवीन यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनने पाण्याची फवारणी करून वणवा आटोक्यात आणला जात आहे. तर, बहुतांश ठिकाणी फायर ब्लोअर या यंत्राचा वापर केला जात आहे. यामधून हवा व पाणी वेगाने सोडून आग आटोक्यात आणली जाते.

सॅटेलाइटवरून येणाऱया संदेशांमध्ये अचूक माहिती मिळत असल्याने वणवा नक्की कोठे लागला आहे, याची माहिती मिळते. त्यानुसार संबंधित अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर वणवा आटोक्यात आणला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोन आणि फायर ब्लोअर या आधुनिक यंत्राचा सातारा जिह्यात वापर वाढत आहे. त्यामुळे भविष्यात वणव्यांची संख्या घटत जाईल.

– महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा.