शुभ शतकारंभ! जैसवाल, गिलच्या शतकांनी लीड्स गाजवले; हिंदुस्थानी यंगवॉलपुढे बॅझबॉलचा फज्जा

हिंदुस्थानच्या नव्या पर्वाचा, नव्या नेतृत्वाचा शुभ शतकारंभ झाल्याने आपले नवे खऱ्या अर्थाने छावे निघाले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानी फलंदाजीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी हिंदुस्थानची युवा पिढी सक्षम असल्याची झलक ब्रिटिशांच्या भूमीवर पहिल्याच दिवशी दिसली.

इंग्लंडच्या भूमीवर प्रथमच खेळत असलेल्या यशस्वी जैसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी ‘यंगिस्तान झिंदाबाद’चा नारा बुलंद करताना वैयक्तिक शतकी धमाके करत अवघे इंग्लंड हादरवले. अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरू झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिका युद्धातील पहिल्या लढाईच्या पहिल्या दिवशी 3 बाद 359 अशी स्फूर्तिदायक मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गिल 127, तर ऋषभ पंत 65 धावांवर खेळत होता.

बॅझबॉलपेक्षा जैसवालच भारी हे यशस्वीने पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने आपल्या इंग्लंड भूमीवरच्या पहिल्याच खेळीत शतकी नजराणा पेश केला. त्याची खेळी 101 धावांवर संपली, पण पुढे गिलने आपला खेळ पुढे ठेवला. ऋषभ पंतच्या साथीने गिलने आपलेही शतक साकारत हिंदुस्थानला दुहेरी आनंद मिळवून दिला. त्याने परदेशातील आपले पहिले शतक साजरे करताना नेतृत्वाचाही शतकारंभ करत हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना अनोखी भेट दिली. एवढेच नव्हे तर दोन वैयक्तिक शतकांप्रमाणे आज दोन शतकी भागीही रचत शतकांचा आगळा चौकार लगावला.

क्रिकेटवारी – टॉस हरणं पथ्यावर पडलं!

आज यजमान इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सच सर्वात यशस्वी ठरला. त्याने दोन यश मिळवले. मात्र अन्य सर्वच वेगवान गोलंदाजांनी निराशा केली. फिरकीवीर शोएब बशीरसुद्धा आपली किमया दाखवू शकला नाही.

IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!