
टीम इंडियाने क्रिकेटविश्वात सर्वाधिक 317 धावांनी विश्वविक्रमी विजय मिळवीत रविवारी श्रीलंकेचा पतंग कापला. या विजयासह हिंदुस्थानने तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेत विजयाच्या हॅट्ट्रीकसह निर्भेळ यश संपादन करून तमाम देशवासीयांची संक्रांत गोड केली. न्यूझीलंडने 2008मध्ये आयर्लंडवर 290 धावांनी विजय मिळविला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 15 वर्षांपूर्वीचा तो विक्रम आज मोडीत काढला. नाबाद दीडशतकी खेळी करणारा विराट कोहली या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळही त्याच्याच गळ्यात पडली.
श्रीलंकेचा उडाला खुर्दा
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 391 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 22 षटकांत 9 बाद 73 धावांवर खुर्दा उडाला. पाहुण्यांचा एक फलंदाज जायबंदी झाल्याने फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. नुवानिदू फर्नांडोने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 19 धावा केल्या. कर्णधार दासून शनाका (11) व कसून रजिथा (नाबाद 13) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. इतर सात फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. हिंदुस्थानकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले, तर मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांना 2-2 बळी मिळाले.
23 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता
श्रीलंकेने 2000मध्ये हिंदुस्थानचा एकदिवसीय सामन्यात 245 धावांनी धुव्वा उडविला होता. हिंदुस्थानचा तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव होता. शारजाहमध्ये झालेल्या त्या लढतीत सनथ जयसूर्याने 189 धावांची तडाकेबंद खेळी करत श्रीलंकेला 299 धावा उभारून दिल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानची 54 धावांत दाणादाण उडाली होती. आता विराट कोहलीची दमदार फलंदाजी आणि गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर हिदुस्थानने 23 वर्षांपूर्वीच्या लाजिरवाण्या पराभवाची सव्याज परतफेड केली.
गिलचे शतक, कोहलीचे दीडशतक
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 5 बाद 390 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार रोहित शर्मा 49 चेंडूंत 3 षटकार व 2 चौकारांसह 42 धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलच्या साथीला विराट कोहली आला अन् श्रीलंकन गोलंदाजांची अवस्था फुफाटय़ातून निघून आगीत पडल्यासारखी झाली. शुभमन गिलने 97 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह 116 धावांची खेळी करीत कारकिर्दीतील दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. विराट कोहलीने 110 चेंडूंत 13 सणसणीत चौकारांसह 8 टोलेजंग षटकार ठोकून आपली नाबाद 166 धावांची खेळी सजविली. कोहलीचे हे 46वे एकदिवसीय शतक ठरले. त्याचे हे मागील चार लढतीतील तिसरे एकदिवसीय शतक होय. गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने 38 धावांची खेळी केली, तर लोकेश राहुल (7) व सुर्यकुमार यादव (4) लवकर बाद झाले. अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून कसून रजिथा व लाहिरू कुमारा यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर चमिका करुणारत्नेला एक बळी मिळाला.




























































