हिंदुस्थानचे लक्ष्य ‘व्हाईटवॉश’, प्रतिष्ठा राखण्यासाठी यजमान विंडीज सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । प्रोव्हीडेन्स

पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा संघ उद्या क्रिकेटच्या रणांगणात उतरणार तो आणखी एका विजयासह वेस्ट इंडीजवर ‘व्हाईटवॉश’ लादण्यासाठीच. एकीकडे विराट कोहलीची सेना सलग तिसर्‍या विजयाला गवसणी घालण्यासाठी जिवाचे रान करील तर दुसरीकडे वेस्ट इंडीजचा संघ किमान एक विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. बघूया उद्या होणार्‍या अखेरच्या ट्वेण्टी-20 लढतीत यश कोणत्या संघाला मिळतेय ते…

गोलंदाजी विभागात बदल होण्याचे संकेत

पहिल्या दोन्ही लढतीत हिंदुस्थानच्या युवा गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केलीय. भुवनेश्वरकुमार, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, नवदीप सैनी, कृणाल पांड्या यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलेय. आता उद्या होणार्‍या लढतीत नवदीप सैनी व रवींद्र जाडेजाला विश्रांती देऊन चहर बंधूंना (दीपक व राहुल) यांना संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रेयसला संधी?

टीम इंडियाचे व्यवस्थापन फलंदाजी विभागात बदल करील अशी चिन्ह दिसत नाहीत. रोहीत शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, मनीष पांडे यांची पुन्हा एकदा वर्णी लागेल. मात्र लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांना संधी मिळेल का, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय.

वन डे आणि कसोटीआधी आत्मविश्वास मिळवायचाय

वेस्ट इंडीज संघाने ट्वेण्टी-20 मालिका गमावली. त्यामुळे उद्याची लढत विंडीज संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. उद्याच्या लढतीच्या निकालाने मालिकेवर परिणाम होणार नाही. पण विंडीजने लढत जिंकल्यास त्यांना वन डे व कसोटीआधी आत्मविश्वास संपादन करता येणार आहे. कार्लोस ब्रेथवेट व कायरॉन पोलार्ड ही मंडळी फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

उभय संघ खालीलप्रमाणे

हिंदुस्थान : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडीज ः जॉन कॅम्पबेल, इविन लुईस, शिमरोन हेथमायर, निकोलस पूरण, कायरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डॉन कॉटरेल, ओशेन थॉमस, अँथोनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खॅरी पीअर.

हिंदुस्थान – वेस्ट इंडीज

तिसरी ट्वेण्टी-20, प्रोव्हिडेन्स, रात्री आठ वाजता