
वर्षा अखेर हिंदुस्थान देश आणि जगासाठी कोरोना प्रतिंबधक लसीचे पाचशे कोटी डोसची निर्मिती करणार अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 परिषदेत दिली. हिंदुस्थानने दीडशेहून अधिक देशांना लस आणि औषधं पुरवली असेही मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही One Earth- One Health हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. भविष्यात कोरोनासाराखे संकट परतवून लावण्यासाठी हे उद्दिष्ट महत्त्वाचे ठरू शकते. हिंदुस्थानने कोरोना काळात दीडशेहून अधिक देशांना औषधं आणि लस पुरवल्या. तसेच लस संशोधन आणि निर्मितीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
अतिशय कमी वेळेत आम्ही हिंदुस्थानात 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिले आहेत. जगातील मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करून जगाला सुरक्षित करण्यास आम्हीही योगदान दिले आहे. या काळात हिंदुस्थानने आपली उत्पादन क्षमता सिद्ध केली आहे असेही मोदी म्हणाले. तसेच या डिसेंबर अखेर पर्यंत हिंदुस्थान कोरोन प्रतिबंधक लसींचे 500 कोटी डोस निर्मिती करेल असेही मोदी यांनी नमूद केले.



























































