हिंदुस्थानी लष्कर आरपारच्या लढाईसाठी सज्ज, लडाख सीमेवर 20 दिवसांत तीन वेळा गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख सीमेवर घुसखोरीची घटना झाली नाही असा कितीही दावा केंद्र सरकार करीत असले तरी चीनच्या कुरपातींमुळे येथे प्रचंड तणाव वाढला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी)तब्बल 45 वर्षांनी गोळय़ा झाडल्या गेल्या आहेत. गेल्या 20 दिवसांत तीन वेळा लडाख सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानचे जवान तयार आहेत.हिवाळ्यातही युद्धास सज्ज आहोत असा इशाराच लष्कराने चीनला दिला आहे.

एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर चीनच्या कुरापती सुरु आहेत. 15 जून रोजी गलवान खोऱयातील हिंसक संघर्षानंतर अनेक वेळा लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱया झाल्या मात्र चीनची घुसखोरी थांबलेली नाही. उलट गेल्या 20 दिवसांत चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुस्थानी जवानांना सियाचीनचा अनुभव हे लक्षात ठेवा

हिंदुस्थानचे जवान नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यात, बर्फाळ आणि प्रतिकूल हवामानात लढू शकणार नाहीत असे तारे चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने तोडले आहेत. याला हिंदुस्थानी लष्कराच्या उत्तर विभागाच्या प्रवत्त्याने जोरदार उत्तर दिले आहे. देश रक्षणासाठी जवान सदैव सज्ज आहेत. हिवाळ्यात युद्धास सज्ज आहोत असेही स्पष्टपणे बजावले आहे.

चीनचा निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा आहे. नोव्हेंबरमध्ये 40 फुटापर्यंत बर्फ असतो. तापमान उणे 30ते 40डिग्री असते. अशा वातावरणात राहण्याचा, मानसिक आणि शारीरिक दृष्टय़ा खंबीर राहण्याचा दीर्घ अनुभव आमच्या जवानांकडे आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून खास प्रशिक्षण दिलेले आहे. कोणत्याही प्रतिकूल हवामानात आमचे जवान सज्ज आहेत.

या ठिकाणी गोळीबार

  • 29-30 ऑगस्टला पँगॉग सरोकराच्या दक्षिण परिसरातील टेकडय़ांवर कब्जा करण्याचा प्रयत्न चिनी सैनिकांनी केला. हिंदुस्थानी जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी गोळीबार झाला.
  • दुसरी गोळीबाराची घटना मुखपारी टेकडय़ांवर झाली. चीनच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी प्रत्युत्तर दिले.
  • तिसरी घटना 8 सप्टेंबरला पँगॉग उत्तर किनाऱयावर झाली. दोन्ही बाजूनी 100 ते 200 राऊन्ड फायर झाले.  

चीनकडून सहा महिन्यांत कोणतीही घुसखोरी नाही, सरकारचे राज्यसभेत घूमजाव

लडाखमधील 38 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनने बळकावली असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले. पण आज राजनाथ सिंह यांना सपशेल खोटे पाडत चीनबरोबर गेल्या सहा महिन्यांत काहीच गडबड झालेली नाही. सगळे काही आलबेल आहे. चीनने घुसखोरी केलीच नाही, असा ठाम दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत केला.

बोफोर्स तैनात

हिंदुस्थानच्या लष्करी तोफखान्यातील बलाढय़ तोफा बोफोर्सची लडाख सीमेवर तैनाती केली आहे. बोफोर्सच्या 155 मिमी तोफांची सर्व्हिसिंग आणि मेन्टेनन्स सुरू आहे.