
हिंदुस्थानात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 325 रुग्ण आहेत. यापैकी 146 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. यानंतर केरळमध्ये सर्वाधिक 430 कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात 66, कर्नाटकात 36, गुजरातमध्ये 17, बिहारमध्ये 5 आणि हरियाणामध्ये 3 नवीन रुग्ण आढळले.
ईशान्येकडील भागातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. मंगळवारी अरुणाचल प्रदेशात दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यापैकी एकाला ताप आणि सौम्य खोकला आहे, तर दुसऱ्या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. मंगळवारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एका 78 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात कोविडच्या नवीन प्रकारामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
दरम्यान, सध्या पसरत असलेला JN.1 हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 उपप्रकाराचा एक व्हेरिएंट आहे. यामुळे हॉंगकॉंग, सिंगापूर, चीन आणि थायलंडमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. हिंदुस्थानातही याच व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या व्हेरिएंटचे लक्षणे सौम्य असली, तरी त्याचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी सतर्कता बाळगली असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.