हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेचा धमाका 27 नोव्हेंबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेचा थरार 27 नोव्हेंबरपासून तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनासंबंधित नियम कडक असल्यामुळे उभय देशांमधील क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकावरही शिक्कामोर्तबाला विलंब झाला. न्यू साऊथ वेल्स सरकारकडून हिंदुस्थानी व ऑस्ट्रेलिया या देशांतील क्रिकेटपटूंना क्वारंटाइनमध्ये सरावाला परवानगी दिल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून गुरुवारी देण्यात आली.

त्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंना सिडनी येथे विलगीकरणात राहावे लागणार आहे. तेथेच त्यांना सरावही करायला मिळणार आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वन डे, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले असले तरी बीसीसीआयकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीए.

… तर बॉक्सिंग डे कसोटी अॅडलेडला होणार

ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटी ही 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत मेलबर्न येथे होते. पण यंदा कोरोनामुळे कदाचित बॉक्सिंग डे कसोटी अॅडलेडला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेलबर्नमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली नाही तर अखेरच्या क्षणी ही कसोटी अॅडलेडला खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक

पहिली वन डे -27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वन डे – 29 नोव्हेंबर- सिडनी
तिसरी वन डे -1 डिसेंबर – पॅनबेरा
पहिली टी-20 – 4 डिसेंबर – पॅनबेरा
दुसरी टी-20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी टी-20 – 8 डिसेंबर – सिडनी
पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर, अॅडलेड (गुलाबी चेंडू)
दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न (पर्याय अॅडलेड)
तिसरी कसोटी – 7 ते 11 जानेवारी, सिडनी
चौथी कसोटी – 15 ते 19 जानेवारी, ब्रिस्बेन