
पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी पराभव झाल्यानंतर ‘टीम इंडिया’ने दुसऱया कसोटीत फिनिक्स भरारी घेताना इंग्लंडला चौथ्याच दिवशी 317 धावांनी धूळ चारून पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. हिंदुस्थानने 89 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली. या मानहानीकारक पराभवासह इंग्लंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी घसरण झाली, तर ‘टीम इंडिया’ने दुसऱया स्थानी झेप घेतली. अष्टपैलू कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन या ऐतिहासिक कसोटी विजयाचा शिल्पकार ठरला. विराट कोहलीच्या सेनेने दुसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. उभय संघांमध्ये आता 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर तिसऱया कसोटी प्रारंभ होणार आहे.
हिंदुस्थानचे मालिकेत पुनरागमन
नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना 329 धावा करणाऱया हिंदुस्थानने इंग्लंडला 134 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 195 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर हिंदुस्थानने दुसऱया डावात 286 धावसंख्या उभारून इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे कठीण आव्हान दिले. हिंदुस्थानच्या फिरकीपुढे पाहुण्यांचा दुसरा डाव 54.2 षटकांत 164 धावांवर गडगडला. हिंदुस्थानने चौथ्याच दिवशी रुबाबदार विजयासह 1-1 बरोबरी साधून द्विपक्षीय मालिकेत पुनरागमन केले.
फिरकी त्रिपुटापुढे भंबेरी
अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव या हिंदुस्थानच्या फिरकी त्रिपुटापुढे चौथ्या दिवशी पाहुण्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अश्विनने मोर्चावर येताच पहिल्याच चेंडूवर डॅनियल लॉरेन्सला (29) चकवले व पंतने चपळाईने त्याला यष्टीचित केले. याच अश्विनने आलेल्या बेन स्टोक्सला कोहलीकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला बहुमोल बळी मिळवून दिला. जो रूटने 92 चेंडूंत 33 धावा करत हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलने रहाणेकरवी झेलबाद करून रूटची खेळी संपविली. मोईन अलीने 43 धावांची आक्रमक खेळी करीत इंग्लंडला 54.2 षटकांत 164 धावांपर्यंत पोहोचविले. हिंदुस्थानकडून अक्षर पटेलने 5, अश्विनने 3, तर कुलदीप यादवने 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान पहिला डाव – 329 धावा ,
इंग्लंड पहिला डाव – 134 धावा,
हिंदुस्थान दुसरा डाव – 286 धावा,
इंग्लंड दुसरा डाव – रोरी बर्न्स झे. कोहली गो. अश्विन 25, डॉम सिबली पायचित गो. पटेल 3, डॅन लॉरेन्स यष्टीचित पंत गो. अश्विन 26, जॅक लिच झे. रोहित गो. पटेल 0, जो रूट झे. रहाणे गो. पटेल 33, बेन स्टोक्स झे. कोहली गो. अश्विन 8, ओली पोप झे. इशांत गो. पटेल 12, बेन फोक्स झे. पटेल गो. कुलदीप 2, मोईन अली यष्टीचित पंत गो. कुलदीप 43, ओली स्टोन पायचित गो. पटेल 0, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद 5.
अवांतर – 7, एकूण – 54.2 षटकांत 164 धावा.
गोलंदाजी – अक्षर पटेल – 21-5-60-5, आर. अश्विन 18-5-53-3, कुलदीप यादव 6.2-1-25-2. इशांत शर्मा 6-3-13-0, मोहम्मद सिराज 3-1-6-0a




























































