
पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरा गेलेला हिंदुस्थानी संघ चेन्नई येथील दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवसअखेरीस प्रंटफूटवर उभा आहे. कर्णधार विराट कोहलीची 25वी अर्धशतकी खेळी (62 धावा) व रविचंद्रन अश्विनचे कसोटीतील पाचवे शतक (106 धावा) आणि दोघांनी निर्णायक क्षणी केलेल्या 96 धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱया डावात 286 धावा उभारल्या. त्यानंतर विजयासाठी 482 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱया इंग्लंडची अवस्था तिसऱया दिवसअखेरीस 3 बाद 53 धावा अशी झाली असून आता त्यांना विजयासाठी 429 धावांची आवश्यकता आहे. विराट कोहलीच्या ब्रिगेडला मात्र चेन्नई येथील दुसऱया कसोटीतील विजयासाठी सात बळी गारद करायचे आहेत. याप्रसंगी यजमान हिंदुस्थानी संघ उद्या अर्थातच चौथ्या दिवशीच विजयाला गवसणी घालून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी सज्ज झाला असेल.

फिरकीसमोर पडझड
हिंदुस्थानने सोमवारी 1 बाद 54 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. पण जॅकी लीच व मोईन अली या फिरकी गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हिंदुस्थानच्या फलंदाजांची दैना उडाली. चेतेश्वर पुजाराला सात धावांवर धावचीत झाला. शॉट लेगला उभ्या ओली पोपने यष्टिरक्षक बेन फोक्सला चेंडू देत चेतेश्वर पुजाराला बाद केले. या वेळी चेतेश्वर पुजाराच्या हातामधून बॅट सुटली आणि त्याला क्रिझपर्यंत पोहोचता आले नाही. त्यानंतर जॅक लीचच्या गोलंदाजीवर रोहीत शर्माला (26 धावा) बेन फोक्सने अफलातूनरीत्या यष्टीचीत केले. रोहीत शर्मा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेऐवजी रिषभ पंतला फलंदाजीला पाठवण्यात आले. पण जॅक लीचच्या गोलंदाजीवर हाणामारी करण्याच्या नादात तोही आठ धावांवर बेन फोक्सकरवी यष्टीचीत झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे मोईन अलीच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन खेळताना ओली पोपकरवी झेलबाद झाला तो 10 धावांवर. मोईन अलीनेच अक्षर पटेलला 7 धावांवर पायचीत पकडले.

दोघे आले धावून
कर्णधार विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन या जोडीने हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. हिंदुस्थानचा संघ 6 बाद 106 धावा अशा बिकट परिस्थितीत असताना दोघांनी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विराट कोहलीने 25वे अर्धशतक साजरे केले. त्याने 62 धावांची खेळी सात चौकारांसह सजवली. तो शतकाच्या दिशेने वाटचाल करीत होता. पण मोईन अलीच्या गोलंदाजीवर तो पायचीत बाद झाला आणि जोडीही तुटली.
कठीण पेपर
इंग्लंडच्या दुसऱया डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अक्षर पटेलने डॉमिनिक सिब्लीला 3 धावांवरच पायचीत केले. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने रोरी बर्न्सला 25 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या जॅक लीचलाही अक्षर पटेलने शून्यावरच तंबूत पाठवले. डॅन लॉरेन्स (19 धावा) व जो रूट (2 धावा) हे फलंदाज खेळपट्टीवर उभे असून आता उद्या चौथ्या दिवशी इंग्लंडसमोर आणखी कठीण पेपर असणार आहे. चौथ्या दिवशीच कसोटीचा खेळ खल्लास होणार हे निश्चित आहे.
खणखणीत शतक
विराट कोहली बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विनने तळाच्या फलंदाजांसोबत भागीदाऱया करताना टीम इंडियाला 286 धावांपर्यंत नेले. त्याने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतकही झळकावले. त्याने 148 चेंडूंचा सामना करताना एक षटकार व 14 चौकारांसह 106 धावांची संस्मरणीय खेळी साकारली. अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराजने नाबाद 16 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. ओली स्टोनच्या गोलंदाजीवर रविचंद्रन अश्विन बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान पहिला डाव – सर्व बाद 329 धावा
इंग्लंड पहिला डाव – सर्व बाद 134 धावा
हिंदुस्थान दुसरा डाव – रोहीत शर्मा यष्टीचीत फोक्स गो. लीच 26, शुभमन गिल पायचीत गो. लीच 14, चेतेश्वर पुजारा धावचीत 7, विराट कोहली पायचीत गो. अली 62, रिषभ पंत यष्टीचीत पह्क्स गो. लीच 8, अजिंक्य रहाणे झे. पोप गो. अली 10, अक्षर पटेल पायचीत गो. अली 7, रविचंद्रन अश्विन त्रि.गो. स्टोन 106, कुलदीप यादव पायचीत गो. अली 3, इशांत शर्मा झे. स्टोन गो. लीच 7, मोहम्मद सिराज नाबाद 16. अवांतर – 20. एकूण 85.5 षटकांत सर्व बाद 286. गोलंदाजी – ओली स्टोन 6.5-1-21-1, जॅक लीच 33-6-100-4, मोईन अली 32-7-98-4.
इंग्लंड दुसरा डाव – रोरी बर्न्स झे. कोहली गो. अश्विन 25, डॉमिनिक सिब्ली पायचीत गो. अक्षर 3, डॅन लॉरेन्स खेळत आहे 19, जॅक लीच झे. रोहीत गो. अक्षर 0, जो रूट खेळत आहे 2, अवांतर – 4, एकूण 19 षटकांत 3 बाद 53 धावा. गोलंदाजी – इशांत 2-1-6-0, अक्षर 9-3-15-2, अश्विन 8-1-28-1.



























































