WORLD CUP 2023 : हिंदुस्थानचीच सत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग सातवा विजय. तोसुद्धा 302 धावांनी. श्रीलंका इतकी पळपुटी असेल वाटलं नव्हतं. हिंदुस्थानच्या 358 धावांचा पाठलाग सोडा धावांची शंभरी गाठण्याचेही प्रयत्न केले नाही आणि 55 धावांवर खेळ सोडून पळाले. 358 समोर 55 धावांत चेंदामेंदा. जगज्जेतेपदाच्या दिशेने हिंदुस्थानने टाकलेले आणखी एक दमदार पाऊल. शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीनेच हिंदुस्थानच्या विजयाचा पाया रचला होता आणि मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याने कळसावर विक्रमी लेपण केले आणि दक्षिण आफ्रिकेकडून गुणतालिकेतील अव्वल स्थान हिरावून घेतले.

हिंदुस्थानने आणखी एका सामन्यात प्रतिस्पर्ध्याला चिरडले. विशेष म्हणजे हिंदुस्थानला एकाही सामन्यात फार संघर्ष करून विजय मिळवावा लागला नाही. सर्वांवर सहज मात केली. हिंदुस्थानने उपांत्य फेरीचा टप्पा गाठला असला तरी उर्वरित दोन्ही लढती जिंकून विजयाचा जल्लोष असाच कायम राखण्याचे ध्येय समोर असेल.

अय्यरचा झंझावात
कोहली-गिलच्या फलंदाजीनंतर श्रेयस अय्यरने सामन्याचा गिअर बदलताना उत्तुंग षटकारबाजी करत हिंदुस्थानी धावसंख्येला प्रचंड वेग दिला. त्याने एक-दोन नव्हे तर सहा षटकार मारले. ते सारे हवाई हल्लेच होते. त्याने कुणावरही दयामया दाखवली नाही. दोघांची शतके हुकल्यानंतर तो शतक हमखास ठोकणार असे वाटत असतानाच त्यानेही आपली विकेट कोहली-गिलसारखीच गमावली. तो 56 चेंडूंत 6 षटकार, 3 चौकार ठोकत 82 वर बाद झाला. तो बाद झाल्यावर रवींद्र जाडेजाने संघाला 357 धावांपर्यंत नेले. लंकेकडून मदुशंकाने 80 धावांत 5 विकेट टिपले. पण त्याच्या फसव्या चेंडूने कोहली, गिल आणि अय्यर तिघांनाही शतकापासून वंचित ठेवले. हीच काय ती लंकन संघातील आजची सर्वात मोठी कामगिरी.

रोहितने दिला धक्का
सुपर फॉर्मात असलेल्या मुंबईकर रोहित शर्माचा खेळ पाहायला अवघी मुंबई वानखेडेवर उपस्थित होती. रोहितने मदुशंकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून सणसणीत सुरुवात केली, पण दुसऱ्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. हा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याइतका जबर धक्का होता.

दोघांची शतके हुकली
रोहितच्या धक्क्यातून हिंदुस्थानला सावरल्यानंतर गिल-कोहलीची जोडी छान जमली. दोघांनी षटकार न ठोकताच चौकार आणि एकेरी-दुहेरी धावा काढण्याची मजा प्रेक्षकांना दिली. श्रीलंकेचा माराही अत्यंत सामान्य भासत होता. दोघांनी पाठोपाठ अर्धशतके साजरी केली, मग गिल थोडा आक्रमक झाला. त्याने डावातील पहिला षटकार चक्क 28 व्या षटकांत ठोकला. मग त्याने पुढच्या षटकात दुसरा षटकारही ठोकला. तो शतकाच्या दिशेने पुढे सरकत होता, पण तो मदुशंकाच्या गोलंदाजीवर फसला आणि त्याचे शतक आठ धावांनी हुकले. विराटसह त्याने 189 धावांची भागी रचली. आधी त्यांची द्विशतकी भागी हुकली आणि पुढे दोघांचे शतकही. विराटही सचिनच्या 49 व्या शतकाची बरोबरी साधणार, तोच गिलसारखा तोसुद्धा फसला आणि 88 वर बाद झाला.

लंकेने निराशा केली
आज श्रीलंकेने सर्वांचीच निराशा केली. हिंदुस्थानी चाहत्यांनी सामना चुरशीचा होईल म्हणून मोठी किंमत मोजून सामन्याची तिकिटे विकत घेतली, पण लंकेने 20 षटकांतच आपला डाव गुंडाळला. 358 धावांचे लक्ष्य अवघड होते, पण त्यांच्या पथुम निस्सांकाने पहिल्याच चेंडूवर माती खाल्ली. बुमराचा चेंडू पॅडवर घेत त्याने आत्महत्या केली. त्यानंतर सिराजने सात चेंडूंत करुणारत्ने, समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांची विकेट घेत लंकेची 4 बाद 3 अशी केविलवाणी अवस्था केली. सिराजच्या सात चेंडूंच्या त्सुनामीनंतर श्रीलंकेची लाजिरवाणी हार निश्चित झाली होती. त्यानंतर मोहम्मद शमीच्या वादळात लंकेची नौका बुडाली. कुणीही हातपाय मारू शकला नाही. त्याने असलंका आणि हेमंता सलग चेंडूवर बाद करत 6 बाद 14 अशी दुर्दशा केली. मग सलग षटकांत आणखी दोन विकेट घेत लंकेची 8 बाद 29 अशी स्थिती होती. मग तळाच्या महीश तीक्षणा आणि कसुन रजिथाने 20 धावांची भागी रचत संघाला पन्नाशी गाठून दिली. अखेर शमीनेच ही जोडी फोडत चौथ्यांदा पाच विकेट घेतले. लंकेच पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. शमीने 18 धावांत लंकेचा अर्धा संघ गुंडाळला तर सिराजने 16 धावांत आघाडीचे 3 फलंदाज बाद केले.