
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा माजी क्रिकेट खेळाडू गौंतम गंभीर राजकारणाच्या पिचवर उतरण्याची शक्यता आहे. भविष्यामध्ये चांगली संधी मिळाल्यास नक्कीच राजकारणात येईल असे गंभीरने म्हटले. ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना गंभीरने हे सूचक वक्तव्य केले आहे. गंभीर पुढे म्हणाला, ‘मी अद्याप माझ्या भविष्याबाबत जास्त काही ठरवलेले नाही, परंतु हा जर संधी मिळाली तर देशाची सेवा करण्यास आवडेल. त्यासाठी राजकारणाशिवाय चांगला पर्याय नाही. मला संधी मिळाली तर मी फक्त रबर स्टॅम्प बनून राहणार नाही.’
सिद्धूवर ओढले आसूड
हिंदुस्थानचा माजी खेळाडू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू याच्या पाकिस्तानमध्ये जाण्यावर गंभीरने आसूड ओढले. गंभीर म्हणाला, ‘मला असे वाटते त्याने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घ्यायला नको होता. स्वदेशातील लोकांच्या भावना ठेच लागेल असे आपण वागू नये.’ तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांबाबत बोलताना गंभीर म्हणाला की, चांगला क्रिकेटर चांगला पंतप्रधान होईलच असे नाही. त्यांना देशातील स्थिती बदलण्यासाठी पावलं उचलावी लागतील.
भावूक संदेशाद्वारे निवृत्ती
मंगळवारी गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर एक भावूक संदेश लिहून त्याने निवृत्त होत असल्याचे आपल्या चाहत्या आणि पाठिराख्यांना सांगितले. 2007 आणि 2011 च्या विश्वविजयी संघातील या हिरोला सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गंभीर आपल्या कारकीर्दीतील अखेरचा सामना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असून उद्या 6 डिसेंबरपासून फिरोजशाह कोटला मैदानावर हा सामना होईल.





















































