
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
चक्रीवादळग्रस्त मोझांबिक देशातील 192 लोकांची हिंदुस्थानी नैदलाने बचावकार्य करून सुटका केली आहे, तर 1,381 लोकांना वैद्यकीय मदत दिल्याची माहिती नौदलाने येथे एका निवेदनाद्वारे दिली. इदाई चक्रीवादळाने पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेला 15 मार्च रोजी तडाखा दिला. या चक्रीवादळाने मोझांबिक, झिम्बाब्वे आणि मालावीला जोरदार तडाखा दिला. मोझांबिक देशाने विनंती केल्यानंतर हिंदुस्थानने आपल्या नौदलाची तीन जहाजे बेईरा शहराकडे धाडली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याने दिली आहे.
आयएनएस सुजाता, आयएनएस शार्दुल आणि आयसीजीएस सारथी या तीन जहाजांवरील हिंदुस्थानच्या नौदल कर्मचाऱयांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत नौदलाने 196 लोकांची सुटका केली असून नौदलाच्या वैद्यकीय शिबिरात 1,381 लोकांवर उपचार करण्यात आले. तेथील हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्ती निवारणासाठी मदतकार्य केले.
हिंदुस्थानच्या चेतक हेलिकॉप्टरने मोझांबिकच्या चक्रीवादळग्रस्त परिसरात अनेक फेऱया मारून स्थानिकांना अन्न व औषधपुरवठा केला. मदतकार्य सुरू राहण्यासाठी आयएनएन मगर या जहाजाने मोझांबिकला मदत साहित्य पुरवले. इदाई चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर मोझांबिकला मदतीचा हात हिंदुस्थानने प्रथम दिला. याखेरीज झिम्बाब्वे आणि मालावी या दोन देशांनाही नौदलाने मदत पाठवली, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.































































