
देशाच्या पश्चिम किनार्याकडील अरबी समुद्रात ड्रोनद्वारे व्यापारी जहाजाला (merchant ship) धडक दिल्याच्या दोन दिवसांनंतर हिंदुस्थानच्या नौदलाच्या स्फोटक शस्त्रास्त्र निकामी पथकानं जहाजाची मुंबई बंदरात आणताना संपूर्ण तपासणी केली. न्यू मंगळुरू बंदराच्या दिशेने जाणाऱ्या एमव्ही केम प्लूटो या व्यापारी जहाजाला ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं.
अरबी समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले पाहता नौदलाने P-8I लांब पल्ल्याची गस्त विमाने टेहळणीसाठी तैनात केली आहेत आणि ‘प्रतिबंधात्मक उपायासाठी’ INS मुरमुगाव, INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका तैनात केल्या आहेत.
इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील इराण-समर्थित हुथी दहशतवाद्यांनी विविध व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केलं. एमव्ही केम प्लूटोवर शनिवारी ड्रोन हल्ला झाला.
‘अरबी समुद्रातील अलीकडील हल्ल्यांचा विचार करता, हिंदुस्थानी नौदलाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्षेपणास्त्र विनाशक, INS मुरमुगाव, INS कोची आणि INS कोलकाता अशा तीन युद्धनौका विविध भागात तैनात केल्या आहेत’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
ते म्हणाले की, सागरी सुरक्षा आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जागरूकता राखण्यासाठी लांब पल्ल्याच्या सागरी सुरक्षेसाठीच्या P8I विमानांना नियमितपणे उड्डाण करून देखरेख करण्याचं काम दिलं जात आहे.
ते म्हणाले, ‘वेस्टर्न नेव्हल कमांडचे सागरी ऑपरेशन सेंटर तटरक्षक दल आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवलं जात आहे’.





















































