हिंदुस्थानचे लष्कर लवकरच आपल्या ताफ्यात 400 किमी पल्ल्याच्या प्रलय क्षेपणास्त्राचा समावेश करणार असून हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे शत्रूचे तळ आणि शस्त्रास्त्रे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार असून एका झटक्यात ती नष्ट करता येणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. प्रलय हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता 150 ते 500 किलोमीटर आहे.
दोनदा यशस्वी चाचणी
शत्रूचे तळ, बंकर, तोफ आणि शस्त्रे डेपो तत्काळ नष्ट करण्याची क्षमता या प्रलय क्षेपणास्त्रात आहे. याआधी डिसेंबर 2021 मध्ये त्याची 24 तासांत दोनवेळा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तैनात केले जाणार आहे.
प्रलय क्षेपणास्त्र 33 फूट त्रिज्येमध्ये आले तरी ते क्षेत्र पूर्णपणे नष्ट होईल. त्याच्या लॉंचिंग सिस्टीममध्ये 8 बाय 8 टाटा ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉँचर आहे. हिंदुस्थानी लष्करात प्रलयचा समावेश झाल्यास देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होईल आणि चीन तसेच पाकिस्तानसोबतच्या युद्धातही त्याची मोठी मदत होऊ शकेल.
क्षेपणास्त्र 2022 मध्ये हिंदुस्थानच्या हवाई दलासाठी मंजूर करण्यात आले होते. यानंतर एप्रिल 2023 मध्ये त्याच्या दोन युनिट्सनाही मंजुरी मिळाली होती. आता हिंदुस्थानी लष्कर आपल्या रॉकेट पर्ह्समध्ये त्याचा समावेश करणार आहे.