दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळले, पायलटचा मृत्यू; चौकशीसाठी IAF ने स्थापन केली समिती

दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिक सुरू असताना हिंदुस्थानी तेजस लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात विमानातील पायलटचा मृत्यू झाला. याचीच चौकशी करण्यासाठी आता हिंदुस्थानी हवाई दलाने समिती स्थापित केली आहे. विमान नेमके का कोसळे, याचाच सर्व तांत्रिक, ऑपरेशनल आणि सुरक्षिततेच्या पैलूंचा सखोल अभ्यास ही समिती करेल.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजता ही घटना घडली. हवेत वळण घेत असताना पायलटचा अचानक स्वदेशी लढाऊ विमान एलसीए तेजसवरील ताबा सुटला आणि विमान जमिनीवर कोसळले. या अपघातानंतर दुबई एअर शो तात्पुरते थांबवण्यात आला होता. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

दरम्यान, तेजस विमानाचा हा दुसरा अपघात आहे. याआधी २०२४ मध्ये जैसलमेरजवळ ही अपघात घडला आहे. दुबई एअर शो दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो आणि तो जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस शोपैकी एक मानला जातो. यात १५० देशांतील १,५०० हून अधिक प्रदर्शक आणि १,४८,००० हून अधिक उद्योग तज्ञ भाग घेतात.