
नववर्षाच्या सुरुवातीलाच बॉलीवूड अभिनेता विकी कौशल वादात सापडला आहे. मध्य प्रदेशात विकीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका स्थानिक व्यक्तीने चित्रपटात बनावट नंबरप्लेट असलेली बाईक वापरल्याबद्दल विकीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अलीकडे विकी आणि साराचे शूटिंगदरम्यानचे सेटवरचे काही फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये विकी कौशल इंदूरच्या रस्त्यावर सारासोबत बाईकवर फिरताना दिसत आहे. हे फोटो बघितल्यानंतर एकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. जयसिंग यादव असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. जयसिंग यांनी आपल्या मालकीची स्कुटी आणि ज्या बाईकवर विकी इंदूरच्या रस्त्यावर सारा अली खानसोबत फिरताना दिसला, त्याचा नंबर एकच असल्याचा दावा केला. चित्रपटात वापरलेला वाहन क्रमांक माझ्या मालकीचा आहे. माझ्या संमतीशिवाय कुणी तो वापरू शकत नाही म्हणून मी तक्रार दिली आहे, असे यादव म्हणाले.
तक्रारदार जयसिंग यादव म्हणाले, चित्रपटाच्या सीनमध्ये वापरलेला वाहन नंबर माझा आहे. चित्रपटातील युनिटला याची माहिती आहे की नाही, मला मला माहीत नाही, पण हे बेकायदेशीर आहे. परवानगीशिवाय माझी नंबरप्लेट कुणी वापरू शकत नाही. मी पोलीस ठाण्यात निवेदन दिलेले आहे. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.
तक्रारीला उत्तर देताना इंदूरच्या बाणगंगा भागातील उपनिरीक्षक राजेंद्र सोनी म्हणाले, आमच्याकडे तक्रार आलेली आहे. नंबरप्लेटचा बेकायदेशीर वापर झाला आहे की नाही, ते आम्ही बघू. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. जर चित्रपट युनिट इंदूरमध्ये असेल तर आम्ही त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करू.



























































