बिझनेसमॅनला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; 10 महिन्यांपासून बेपत्ता असलेली इन्फ्लुएंसर पोलिसांच्या जाळ्यात

एका बिल्डरला हनीट्रॅप करून त्याच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचा आरोपाखाली एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला अटक करण्यात आली आहे. ही आरोपी गेल्या 10 महिन्यांहून अधिक काळ फरार होती. दरम्यान पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसारस कीर्ती पटेल असे त्या इन्फ्लुएंसरचे नाव असून ती सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पटेलवर सुरतमधील एका बिल्डरला हनीट्रॅप करून नंतर त्याला ब्लॅकमेल करून कोट्यवधींची मागणी केल्याचा आरोप होता. या आरोपाखाली गेल्या वर्षी 2 जून रोजी सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान काही काळानंतर न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंटही जारी केले होते. कीर्तीसह आणखी चार जणांची नावे होती आणि त्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सुरतमधील न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतरही, पटेलने शहरे बदलू लागली. आपला सुगावा पोलिसांना लागू नये यासाठी तिने अनेक फोननंबर बदलले. असे गेली 10 महिने सातत्याने सुरू होते. अखेर पोलिसांनी अहमदाबादच्या सरखेज भागातून आरोपी कीर्ती पटेलच्या मुसक्या आवळल्या.

आम्ही गेल्या 10 महिन्यांपासून कीर्ती पटेलचा माग काढण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या तांत्रिक टीम आणि सायबर तज्ञांच्या मदतीने, आम्ही अहमदाबादमधील सरखेजमधील तिचे लोकेशन ट्रॅक केले. आम्ही अहमदाबादमधील आमच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तिला अटक केली. तिच्यावर हनीट्रॅपिंग आणि खंडणीचा आरोप आहे… या 10 महिन्यांत, गुजरातच्या वेगवेगळ्या भागात तिचे लोकेशन सतत बदलत राहिले. आयपी अॅड्रेस बदलत राहिले, तसेच तिचे फोन नंबर आणि सिम कार्डही बदलत राहिले. तिचे लोकेशन मिळवण्यासाठी आम्ही इंस्टाग्रामशीही संपर्क साधला,” असे पोलिस उपायुक्त आलोक कुमार म्हणाले.