महाराष्ट्राची लाइफलाइन सुरळीत सुरू होणार, ऍड. अनिल परब यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड साथीमुळे आधीच तोटय़ात असलेल्या एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कामगारांच्या आंदोलनाची भर पडल्याने राज्यभरात एसटीची चाके थांबली. आता एसटी पुन्हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष ऍड.अनिल परब यांनी दिली आहे. एसटीला नवी उभारी देण्यासाठी तिला निधीची मदत व अन्य उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

   उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱयांना 22 एप्रिल, 2022 पर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी सोमवारी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ऍड. परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘संपामुळे गेले पाच महिने एसटीच्या गाडय़ा बंद राहिल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. या गाडय़ांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविड पूर्व काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही ऍड.अनिल परब यांनी सांगितले.