
कोरोनामुळे मुंबईतील घर खरेदीदारांनी आपल्या निकषांमध्ये काहीसा बदल केला आहे. त्यानुसार ज्या परिसरात पायाभूत सुविधांबरोबरच वाहतुकीची सुविधा, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बिझनेसच्या दृष्टीने योग्य असलेल्या ठिकाणाला खरेदीदार पसंती देत आहेत. त्यामुळे वडाळा, शीव, कुर्ला ही रिअल इस्टेटची सर्वोत्तम ठिकाणे ठरली असून ग्राहक त्याला पसंती देत आहेत. 2020-21च्या पहिल्या तिमाहीत येथे 538 घरांची विक्री झाली होती. त्या तुलनेत 2021-22च्या पहिल्या तिमाहीत 227 टक्क्यांची वाढ म्हणजे 1759 घरांची विक्री झाली आहे.
वडाळा, शीव, कुर्ला ही मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला प्रवास करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणे असून काही वर्षांत निवासी रिअल इस्टेटचे केंद्र म्हणून उदयास आल्याचे रॉकफोर्ड ग्रुपचे सीईओ जितेंद्र शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर या ठिकाणांपासून वांद्रे-कुर्ला संकुल नजीक असल्याने गुंतवणूकदार आणि मध्यमवर्गीयांसाठी सर्वात पसंतीचा पर्याय बनला आहे. या भागातील मोठय़ा प्रमाणावरील औद्योगिक प्रकल्पांमुळे त्याला चालना मिळाली आहे.



























































