रेल्वे भरतीत राज्यातील 300 तरुणांना डावलले,उमेदवारांची हायकोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

सामना ऑनलाईन,मुंबई

भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या तसेच वैद्यकीय तपासणीत पास झालेल्या राज्यातील शेकडो तरुणांना रेल्वे प्रशासनाने चतुर्थ श्रेणी नोकरभरतीत डावलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई, नागपूर, पुण्यासह शेकडो उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार पदांकरिता रेल्वे प्रशासनाने 2007 साली जाहिरात काढली होती. 2011 साली प्रत्यक्ष या प्रक्रियेला सुरुवात झाली. या भरती प्रक्रियेत मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूरसह राज्यातल्या ग्रामीण भागातील होतकरू तरुणांनी अर्ज केले होते. या भरतीप्रक्रियेत अनेक तरुण वैद्यकीय तपासणीत पास झाले. त्यांना त्यासंदर्भातील पत्रही देण्यात आले, परंतु एकाही उमेदवाराची त्यामध्ये निवड झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांनी कनिष्ठ न्यायालयात अपील केले, परंतु न्यायालयाने या तरुणांना दिलासा देण्यास नकार देत रेल्वेच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाविरोधात योगेश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे व इतर उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.