थकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा! कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिवंडी

कर वसुलीसाठी मोठमोठ्या महापालिका थकबाकीदारांवर सवलतींचा पाऊस पाडत असताना भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने मात्र थकबाकी भरा अन् वर्षभर मोफत दळण दळा, अशी अनोखी शक्कल लढवली आहे. वर्षभर मोफत दळण दळून मिळणार म्हणून ग्रामस्थांनीही या फंडाला जोरदार प्रतिसाद देत अवघ्या दहा दिवसांमध्ये 13 लाखांची थकबाकी भरली आहे. थकबाकी वसुलीसाठी दळण दळण्याची ही भन्नाट आयडियाची कल्पना राबवणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

हजारो कोटींचे बजेट असलेल्या महापालिकांमध्ये थकबाकीही कोटींच्या घरातच पोहोचते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी अनेक महापालिका अभय योजना राबवत कर सवलत देतात. मात्र मोठमोठ्या महापालिकांनाही जे सुचले नाही ते भिवंडीतील शेलार या छोट्या ग्रामपंचायतीने करून दाखवले. घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या थकबाकी वसुलीसाठी या ग्रामपंचायतीने मोफत दळण दळण्याची योजना सुरू केली आहे. सुरुवातीला गावात घरोघरी जाऊन कापडी पिशव्यांचे वाटप करून थकबाकी भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरपंचासह सर्वच सदस्यांनी ग्रामसभेत ठराव करून मोफत दळण योजना सुरू केली.

पिठाच्या गिरणीत महिला कर्मचारी
ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीने खास पिठाची गिरणी सुरू केली आहे. दळण दळण्यासाठी बहुदा महिला येत असल्याने ही गिरणी चालवण्यासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.

  • शेलार ग्रामपंचायत भिवंडी शहरालगतच असल्याने या परिसरात 40 हजारांच्या वर लोकसंख्या असून मोठ्या प्रमाणावर चाळी, इमारती, बंगले तसेच विविध कारखाने, लूम, गोदामे आहेत.
  • गेल्या अनेक वर्षांपासून काही थकबाकीदारांनी घरपट्टी, नळपट्टी व इतर कराचा भरणा केला नसल्याने ही थकबाकी कोटींच्या घरात गेली होती.
  • वसुलीचा तोडगा काढण्यासाठी सरपंच संदीप पाटील यांनी ग्रामपंचायतमधील सर्वच सदस्य व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवला आहे.