
मजूर असल्याचे दाखवून मुंबै बँकेचे बेकायदेशीरपणे अध्यक्ष बनणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी साडेतीन तास कसून चौकशी केली. बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांच्या विरोधात दाखल गुह्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
मजूर नसतानाही मजूर आहे असे भासवून प्रवीण दरेकर हे गेली 25 वर्षे मुंबै बँकेचे सदस्य होते. त्यापैकी दहा वर्षे संचालक व दहा वर्षे बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुह्याच्या तपासाकरिता पोलिसांनी सोमवारी दरेकर यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार आज सकाळी साडेअकरा वाजता दरेकर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर तपास अधिकाऱयांनी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. तीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण दरेकर हे पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास परत येईन, असे दरेकर म्हणाले.



























































