INS विक्रांत निधी घोटाळा सध्या गाजत आहे. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्र अडचणीत आले असून त्यांना न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहून चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी सविस्तिर भूमिका मांडली. तसेच सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्यानंतर ते पक्षाला देणे हे आक्षेपार्ह असल्याचेही पवार म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, ‘आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केले असं दिसतं आहे. जर पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याबद्दल मला माहित नाही. कुणीतरी छापलं आहे की हे पैसे पक्ष कार्यालयाकडे सोपवले’.
हे खरं आहे का असा प्रतिप्रश्न त्यांनी करताच कोर्टात त्यांच्या वकिलानेच तसं सांगितल्याची माहिती पत्रकारांनी दिली. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘पैसे पक्षाला दिले असतील हे खरं असले तर मग तो एक रुपया असो, 11 हजार असो किंवा 50 कोटी असो. पैसे या कामाच्यासाठी गोळा केले, लोकांच्या भावनेस हात घातला. लोकांच्याकडून काही जी रक्कम आली असले ती आली. मग ती पक्षाकडे का दिली? आर्म फोर्सेस वेल्फेअर फंड आहे समजा तिथे देता आली असती, जवानांचा एक निधी असतो तिथे देता आली असती, नौदल-हवाईदल-भूदळ या यंत्रणेशी संबंधीत यंत्रणा किंवा विभागाला देता आली असती. पण तिथे न देता पक्षाकडे दिली, माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे,’ अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
























































