
सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन
मंगळाचा सखोल अभ्स करण्यासाठी नासाने पाठवलेला मार्स इनसाई’ लेंडर हे यान यशस्वीरित्या मंगळावर उतरले आहे. मंगळग्रह पृथ्वीपेक्षा वेगळा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या रोबोटची मदत होणार आहे. या रोबोटने मंगळावर उतरताच आपलं काम सुरू केलं असून पहिला फोटो या रोबोटने पृथ्वीवर पाठवला आहे.
Our Mars Odyssey orbiter phoned home, relaying news from @NASAInSight indicating its solar panels are open & collecting sunlight on the Martian surface. Also in the dispatch: this snapshot from the lander’s arm showing the instruments in their new home: https://t.co/WygR5X2Px4 pic.twitter.com/UwzBsu8BNe
— NASA (@NASA) November 27, 2018
हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे दीड वाजता हे यान मंगळावर उतरले. लँडींगची ही सगळी प्रक्रिया जवळपास सात मिनिटं सुरू होती. हे यान जसे मंगळावर उतरले तसं या मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा असलेले सगळे नासाचे वैज्ञानिक आनंदाने नाचायला लागले होते. ही सगळी घटना नासाने थेट प्रक्षेपित केली होती. मंगळाच्या कक्षेत हे यान आणण्यासाठी यानाचा वेग 19800 किलोमीटर प्रति तास इतका होता. जो हळूहळू कमी करत यान मंगळावर उतरवण्यासाठी ८ किलोमीटर प्रतितास इतपर्यंत कमी करण्यात आला. नासाने या मोहिमेसाठी 7044 कोटी रूपये खर्च केले आहेत.
6 महिन्यांत 42.2 कोटी किलोमीटरची यात्रा पूर्ण करून हे यान मंगळावर उतरले आहे. पॅराशूट आणि ब्रेकींग इंजिनचा वापर करून या यानाचा वेग कमी करण्यात आला आणि त्याला मंगळावर उतरवण्यात आले. या यानाने पाठवलेले संदेश पृथ्वीवर प्राप्त होण्यास जवळपास ८ मिनिटांपेक्षा थोडा जास्त अवधी लागत आहे. अमेरिकेने मंगळावर स्वारी करण्याचे 9 वेळा प्रयत्न केले आहेत. गेल्यावेळचा प्रयत्न सोडल्यास त्यांचे सगळे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. गेल्या वेळचा प्रयत्न असफल ठरल्याने यंदा नासाचे वैज्ञानिक अधिक आनंदीत झाले आहेत
2012 साली नासाने मंगळावर क्युरोसिटी नावाचे यान पाठवले होते. मंगळावर पाणी आहे की नाही त्याचा शोध घेण्यासाठी हे यान पाठवण्यात आले होते. या मोहिमेला उत्तम यश मिळालं होतं कारण मंगळावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले होते. नव्या यानाच्या माध्यमातून नासा, मंगळाच्या गर्भात काय चालतं त्याचा शोध लावणार आहे. तिथे भूकंप येतात का ? लाव्हा फुटतो का, भूगर्भातील हालचाली केव्हा आणि कशा होतात या गोष्टींचा शोध लावण्यास या रोबोटमुळे मदत होईल.


























































