पीएनबी प्रकरणात इंटरपोलची नीरव मोदीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस

49

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर इतर देश नीरव मोदीविषयी सतर्क होती आणि त्याच्या एका देशातून दुसऱ्या देशात पळून जाण्यावर निर्बंधही घातला जाईल. त्यामुळे नीरव मोदी लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.

मोदीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याविषयी सीबीआयने इंटरपोलला विनंती केली होती. त्यानुसार इंटरपोलने नीरव मोदीविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीचं प्रत्यार्पण करण्यात यावं यासाठी सक्तवसुली महासंचालनालयाचे प्रयत्न सुरू होते. यासाठी ईडीने न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. पीएमएलए कोर्टाने ईडीच्या याचिकेला मंजुरी देत प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, प्रत्यार्पणासाठी हा आदेश परराष्ट्र मंत्रालयात जाईल आणि तिथून तो ब्रिटीश सरकारकडे पाठवण्यात येईल. कारण, नीरव मोदी सध्या इंग्लंड येथे लपून बसल्याची माहिती मिळत आहे. या खेरीज ईडीने बेल्जिअमसह अन्य काही देशांनाही प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी अर्ज केले आहेत.

इंटरपोलद्वारे जारी केली जाणारी ही नोटिस हा एक कायदेशीर इशारा असतो. जेव्हा एखाद्या देशाचा नागरिक गंभीर गुन्ह्यांखाली वॉरंट जारी झालेलं असताना पळून जातो, तेव्हा इंटरपोल अशा नागरिकाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करू शकतं.

आपली प्रतिक्रिया द्या