‘स्व’ चा शोध सुरूच आहे!

429

>> मिलिंद शिंदे

मंगेश कंठाळे… फॅशन कोरिओग्राफरपासून सुरू झालेला प्रवास अव्याहत सुरू आहे….

तुम्ही मला तुमच्यात का घेत नाही?’ मंगेश कंठाळेला असा प्रश्न पडायचा. त्याचं महाविद्यालय सिंबायोसिस पुणे, अतिशय नावजलेले. पण तिथल्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मंगेशला काही शिरकाव करता येईना. तो प्रयत्न करायचा, त्यांच्यात जाण्याचा, त्याला नाटक आवडायचं, त्या सगळय़ा प्रकारात तो रमायचा, पण त्याला काही कुणी दाद दिली नाही ना त्याला कुणी त्या कलामंडळात समाविष्ट केलं. त्यातून त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की नेमका अडसर काय आहे, मला का तुम्ही सहभागी होऊ देत नाही? हा प्रकार कमी अधिक प्रमाणात प्रत्येक महाविद्यालयांत, प्रत्येकासोबत घडत असतोच. पण इथं मंगेशनं त्या प्रश्नाला थोडं वेगळय़ा पद्धतीनं घेतलं. त्याचा प्रश्न होता ‘तुम्ही मला तुमच्यात का घेत नाही?’ त्याने थोडा प्रश्नाचा रोख बदलला, तुम्ही मला तुमच्यात घेत नाही का…? आणि त्यानं स्वतःच एक धांडोळा आरंभला, की इथं तर प्रवेश नाही. मग काय करावं? मंथनाअंती त्याला फॅशन कोरिओग्राफीनं आकर्षित केलं. तो त्यात रमला… एखादा त्यात रमतो. त्या सगळय़ा चकचकीत प्रकाशझोतात स्वतःला हरवून घेतो. तिकडं त्याचं फॅशन कोरिओग्राफर म्हणून नाव होत होतं. पण मंगेश पुन्हा स्वतःच्या आत डोकावू लागला आणि हे नाहीये मला जे करायचं… मला गोष्ट सांगायचीय. उलगडायचीय. मंगेशला गोष्ट सांगायला फार आवडतं. तो त्यात रमतो. गोष्टीत गुंतून जातो आणि त्यातला गाभारा बाहेर काढतो. दर्शनी करतो… सादर करतो.. हे सगळं आता आहे. पण पुण्यात त्याला ही संधी काही कह्यात येत नव्हती. कला जरी मनःस्वास्थ्य देत असली, तरी अर्थस्वास्थ्य हाही विषय होताच. वडील बजाज कंपनीत कर्मचारी. त्यामुळे कलेवर कितीही प्रेम असलं तरी एका वास्तवाला सामोरं जावंच लागतं.

नोकरी…मंगेशनं नोकरी पत्करली. घरची परिस्थिती फार वाईट नसली तरी, फार बरीही नव्हतीच. त्यामुळे कमावतं होणं अगत्याचं होतं. एका शिपिंग कंपनीमध्ये मंगेश रुजू झाला. नोकरी लागली आणि तो एका गोष्टीसाठी ‘एलिजिबल’ झाला, ‘लग्न’… त्याचा विवाह झाला. साधारणतः कलाकाराला त्याला कंफर्टेबल वेळ नसेल तर लग्न मानवत नाही आणि खास करून ऍरेंज मॅरेज तर नाहीच. पण ऍरेंज मॅरेज असूनही पल्लवीच्या रूपानं त्याला मोठा आधार आला आणि मंगेशला पुन्हा क्षितिज खुणावू लागलं. पुण्यामध्ये लग्न, नोकरी, त्याची नोकरी, ?? चालूच होती. एकदिवस त्यानं पल्लवीला सांगितलं की, मी हा नाहीये… मला हे करायचं नाही… पल्लवीलाही तोवर हा अंदाज आला होताच की याचं मैदान हे नाहीये. तिनं त्याला सूट दिली… ‘तू तुझं जग’ बाकी मी सांभाळते’ या पहिल्याचं आश्वस्त सुरामध्ये मंगेशचा पल्लवीबद्दलचा आदर दुणावला. नोकरी सोडली. पल्लवीनं धरली. आणि एका ध्यासानं झपाटल्यासारखा मंगेश काम करू लागला. अगदी पडेल ते म्हणजे सेट डिझाईनपासून ते कपडे धुण्यापर्यंत… कामाचे तास असे आखून न घेता. तसं मंगेशकडे सिनेमा नाटकाचं औपचारिक शिक्षण नाही. पुणे म्हणजे FTII… त्याला भारी युक्ती सुचली. जे इथं शिकले आहेत, त्याचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण झाला आहे. त्यांना शेवटी एका डिप्लोमा फिल्म करावी लागते. आपण त्यांच्याकडेच का काम करू नये…? ही युक्ती कामी आली आणि उमेश कुलकर्णी राघवधर, धिरज सिंग या त्यावेळच्या उमद्या दिग्दर्शकांच्या हाताखाली तो काम करू लागला. शिकू लागला. अनभवू लागला. पण आता या कलाकाराची भूक, जिगीषा वाढली होती… मुंबईकडं जाणारा हायवे (एक्प्रेस वे) खुणावत होता. मुंबई भल्याभल्याना घडवते. भल्याभल्यांना घरीही पाठवते… मुंबई म्हणजे पैसे हवेत. मंगेशकडं काही आणि पल्लवीचे काही, असे मिळून चाळीस हजार जमले आणि आपण एक वर्ष मुंबईत राहू शकू याची तजवीज केली. एक वर्षात झालं तर ठिक नाहीतर आर्थिक रसद संपली की वाट परतीची धारायची. मंगेश भटकू लागला. पल्लवी खंबीरपणे त्याच्या सोबत उभी होतीच. घडत काही नव्हतं. वाट पहात होता. महिनेही संपत होते. घराचं संपणारं कॉन्ट्रक्ट, सरणारे दिवस सगळं काही निर्णयाचा पुनर्विचार करायला लावणारं होते. मंगेश ठाम आहे. तो झगडतो. वाट काढतो. शशांक सोलंकी हे व्यक्तिमत्त्व त्याला भेटलं आणि मंगेशला वाट सापडली. शशांक सोलंकीबद्दल बोलतांनाही मंगेशच्या चेहऱ्यावर अनाहुतपणे अदब येते, आणि शशांक सोलंकी त्याच्यासाठी काय आहे हे अधोरेखित होते. वाट सापडली. वादळवाट मराठी मालिका मालिका विश्वातलं अग्रणी नाव. तिथं मंगेश घडला.

मंगेशला हवं ते मिळू लागलं. तो रमू लागला. कामाचं कौतुक होऊ लागलं. नावाची शिफारस होऊ लागली. निखिल सानेंना काम आवडलं. त्यांनी ते प्रसाद ओक करवी त्याला कळवलं. पण मंगेशला निखिल साने म्हणजे कोण तोवर फार माहीत नव्हतं. कुंकू सिरीयल आली. त्याला बहाल झाली. त्यामागे एक माणूस होता. निखिल साने. सानेंना मंगेश खूप मानतो. मिटिंग चालू… कुंकू मालिकेतील कथानकापासून ते पात्र योजना सगळं मार्गी लागलं. एक माणूस मंगेशला येऊन भेटला. नमस्कार मी निखिल साने… मंगेश भरून पावला. इतके साधे, सरळ निखिल साने, मी तुझ्यासाठी काही केलंय याचा सुतराम भावही त्यांच्या वागण्यात नव्हता. नाही. जसं हौशी नाटकवाल्याला व्यावसायिक नाटक हवं असतं, आणि व्यावसायिक नाटकवाल्याला मालिका हवी असते, मग मालिकावाल्याला सिनेमानं नाही खुणावलं तर नवलच. मंगेशही कुंकू, तू तिथे मी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, एकाच या जन्मी जणू, सर आली या मालिका करत होता. पण, त्याच्या मनात आता सिनेमा आकार घेत होता. पल्लवी आताशा मोठय़ा औषध कंपनीमध्ये मोठय़ा पदावर पोहचली होती, तर मंगेशही नावारूपाला आला होता. सगळय़ा बाजूनं एका अर्थी सार्थ झालं होतं. त्याला आता सिनेमाचा पडदा आकर्षित करू लागला. त्याला सिनामाच्या पडद्याची भुरळ पडली आणि त्यातून तीन चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर सिनेमा आकाराला आला. ‘सूर सपाटा’ सिनेमाचं कौतुक झालं. त्याचं बळ वाढलं. आता तो आणखी नवीन कथा, पटकथांवर काम करतोय- पुन्हा एकदा पल्लवीची भक्कम साथ आहेच. तो म्हणतो की तो ‘‘एक क्लीक दूर आहे त्याला हव त्या गोष्टींपासून.’’ मला वाटतं तो क्लीक झालाय. ऑलरेडी बफर होतंय. कुठल्याही क्षणी ते घडू शकतं…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या