चिदंबरम यांच्या कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी .चिदंबरम यांच्या कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अधिक चौकशी करण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे चिदंबरम यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी अशी विनंती केली होती.

चिदंबरम यांना शुक्रवारी नवी दिल्लीतील राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने चिदंबरम यांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला केली.  यावर न्यायमूर्तींना सीबीआयला धारेवर धरले. तुम्ही आधीच 15 दिवसांच्या कोठडीची मागणी का नाही केलीत? रोज तुम्ही चिदंबरम यांची किती तास चौकशी करता असा सवाल करत न्यायालयाने सीबीआयचे कान उपटले. त्यावर आम्ही चिदंबरम यांची रोज 8 ते 10 तास चौकशी करत असल्याचे सीबीआयने सांगितले. मात्र चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत. समाधानकारक उत्तरे देत नाहीत. यामुळे अन्य आरोपींची व त्यांची चौकशी करावी लागणार आहे, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.  या उत्तरावर नाराज झालेल्या न्यायमूर्तींनी सीबीआयला पुन्हा झापले. जर तुम्ही चिदंबरम यांची रोज 10 तास चौकशी करता तर मग मला एवढे कमी कागदपत्रे का देता असा सवाल न्यायालयाने सीबीआयला केला.

त्यावर आपली बाजू मांडताना सीबीआय म्हणाले की चिदंबरम यांच्या रिमांडचा अवधी वाढवल्यास याप्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर येतील. दरम्यान सीबीआयच्या कोठडीत असलेल्या चिदंबरम यांची अधिकाऱ्यांकडून रोज चौकशी होत आहे.