
गतविजेता मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल मोसमात प्रतिमेला साजेशी कामगिरी केलीय. मागील चार लढतींमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊलही टाकलेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सचा संघ उद्या अबुधाबी येथील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या ब्रिगेडचे पारडे जड असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोलकाता नाईट रायडर्सला मागील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सपाटून मार खावा लागला होता. आता या पराभवाला मागे टाकून दिनेश कार्तिकच्या संघाला झोकात पुनरागमन करावे लागणार आहे.
रोहितची दोन अर्धशतके याच ग्राऊंडवर
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अबुधाबी येथील झायेद स्टेडियमवर दोन अर्धशतकी खेळी साकारली आहेत. उद्या मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये याच स्टेडियममध्ये लढत रंगणार आहे. यामुळे रोहित शर्माकडून आणखी एका चांगल्या खेळीची आशा बाळगायला हरकत नाही.
इतिहास रोहित शर्मा ऍण्ड कंपनीच्या बाजूने
मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आतापर्यंत 26 लढती झाल्या आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने यामधील 20 लढती जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला फक्त सहा लढतींमध्ये विजय मिळवता आलेला आहे.
सर्वच फॉर्ममध्ये
मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. क्विंटॉन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांडय़ा, कायरॉन पोलार्ड हे फलंदाजी तर ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जेम्स पट्टीनसन, राहुल चहर हे गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करताहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्ससाठी उद्याचा पेपर सोप्पा नसेल एवढे मात्र पक्के आहे.
सुनील नारायणच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील लढतीतही तो खेळू शकला नाही. तसेच उद्याच्या लढतीतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच आंद्रे रस्सेल हा परदेशी खेळाडूही फॉर्ममध्ये नाहीए. शुभमन गिल हा युवा फलंदाज चांगली कामगिरी करतोय. पण दिनेश कार्तिक, ओएन मॉर्गन, नितीश राणा यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत नाहीए. पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती यांच्याकडून गोलंदाजीत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. कुलदीप यादवचे संघात पुनरागमन होते का हे पाहणेही रंजक ठरणार आहे.
- आजची लढत – मुंबई इंडियन्स वि.कोलकाता नाईट रायडर्स (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी रात्री 7.30 वाजता)
































































