
लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आणि क्रिकेटविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या पर्वाचा बिगुल उद्या शनिवार, 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वाजणार आहे. गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 7.30 वाजता उद्घाटनाच्या लढतीला प्रारंभ होणार आहे. 2011 नंतर प्रथमच यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ कौशल्य पणाला लावण्यासाठी जय्यत मोर्चेबांधणी करून मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आलेली कडक नियमावली… नव्या नियमामुळे वाढलेली रंगत… आणि टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची रंगीत तालीम. आदी कारणांमुळे मायदेशात होणारा आयपीएलचा 15 वा हंगाम खऱया अर्थाने संस्मरणीय ठरणार आहे.
लखनौ, गुजरात संघांचे पदार्पण
यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्स व गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ पदार्पण करणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे 2019 नंतर प्रथमच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामने बघता येणार आहेत. कोविड-19 च्या धसक्यामुळे मोठी रिस्क घ्यायला कोणीही तयार नसून 25 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन नव्या संघांची भर पडल्यामुळे आयपीएलमधील सामन्यांची संख्या 60 वरून 74 झाली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे.
मोठा प्रवास टाळण्यासाठी…
गतवर्षी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा अर्ध्यावर स्थगित करून नंतर यूएईमध्ये उर्वरित स्पर्धा घ्यावी लागली होती. त्यामुळे मोठा प्रवास टाळण्यासाठी यंदाच्या आयपीएलमधील सर्व साखळी सामने महाराष्ट्रातील मुंबई व पुणे येथील चार स्टेडियमवर होणार आहेत. दोन महिन्यांपर्यंत खेळपट्टीला जिवंत ठेवण्यासाठी क्यूरेटरचा खरा कस लागणार आहे.
चेन्नई-कोलकाता भिडणार
गत आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स हे तुल्यबळ संघ शनिवारी उद्घाटनाच्या लढतीत भिडणार आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने एका वेगळ्याच अंदाजात फायनल गाठली होती. चेन्नई सुपरकिंग्जने किताबी लढतीत कोलकाताला नमवून चौथ्यांदा आयपीएलच्या करंडकावर नाव कोरले होते. आता नव्या हंगामात उभय संघांमध्ये सलामीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असणार आहे. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहेत. कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व श्रेयस अय्यर आणि चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व रवींद्र जाडेजा करतोय. इतिहासात डोकावल्यास चेन्नई सुपरकिंग्जची बाजू सरस आहे. दोन्ही संघांत एकूण 26 सामने झाले आहेत. यात 17 सामने चेन्नई सुपरकिंग्जने तर फक्त 8 सामने कोलकाता नाइट रायडर्सने जिंकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला दोन्ही साखळी सामन्यांत पराभूत केले होते. शिवाय अंतिम लढतीतही चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता माइट रायडर्सला 27 धावांनी पराभूत केले होते. मात्र सलामीच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. चेन्नई शुपरकिंग्जने आतापर्यंत 12 उद्घाटनाचे सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने सलामीचे 14 पैकी 10 सामने जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सलामीच्या लढतीकडे क्रिकेटप्रेमी नजरा लावून बसले आहेत.


























































