
आयपीएल 2023 च्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 9 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासेनच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाला फिल सॉल्ट आणि मिचेल मार्शच्या शतकी भागीदारीनंतरही 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावाच करता आल्या.
198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी झाली. फिल सॉल्ट 35 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. सॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्लीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मनीष पांडेला एकच धाव करता आली. दरम्यान, मिचेल मार्श 39 चेंडूत 63 धावा करून बाद झाला. प्रियम गर्गने 12 धावांचे योगदान दिले. सर्फराज खानला केवळ 9 धावा करता आल्या. अक्षर पटेल 14 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. रिपल पटेलने 11 धावा केल्या. हैदराबादकडून मयंकने दोन, भुवनेश्वर, अकील, नटराजन आणि अभिषेकने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या दमदार खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेकने सर्वाधिक 67 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी मिचेल मार्श हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मयंक अग्रवाल अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुल त्रिपाठीने 6 चेंडूत 10 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामही स्वस्तात बाद झाला. संथ खेळी करत त्याने 13 चेंडूत 8 धावा केल्या. हॅरी ब्रूक खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.





























































