
अवघ्या काही तासांनी आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात घमासान युद्ध सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यावहिल्या विजेतपदासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आयपीएलचा चाहतावर्ग जगभरात पसरला आहे. त्यामुळे सामन्याच्या निकालावरच नाही तर, प्रत्येक चेंडूंवर, विकेटवर आणि चौकार-षटकारांवर सट्टा लावला जात आहे. या सट्टेबाजांमध्ये जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेकचा देखील समावेश असून त्याने आपल्या आवडत्या संघावर 6 कोटींची पैज लावली आहे.
आयपीएलच्या फायनलचा थरार पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघांचे चाहते मोठ्या संख्येने नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. फक्त हिंदुस्थानातच नाही तर जगभरात दोन्ही संघांचे चाहते आहेत. प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या RCB वर 6 कोटी 43 लाख रुपयांची पैज लावली आहे. जर RCB ने आयपीएलचे विजेतेपद पटकावले तर, ड्रेक मालामाल होणार आहे. ड्रेकने इन्स्टाग्रावर एक स्किन शॉर्ट शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या स्किनशॉर्टनुसार, ड्रेकने RCB ला विजेतेपदाच दावेदार मानलं असून त्याने RCB च्या विजयावर US$750,000 (6 कोटी 43 लाख रुपये) चा सट्टा लावला आहे.






























































